पूर पाण्यासाठी सटाण्यातील शेतकऱ्यांचे उपोषण

सटाणा तालुक्यातील सुकड नाला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा पिण्याचा पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघुप्रकल्पातील पूर पाणी सुकडनाल्यात सोडावे, या प्रहार संघटनेच्या  नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सटाणा येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. कार्यालयाच्या आवारात मंडप टाकण्यास अधिकाऱ्यांनी विरोध केला असता उपोषणकर्ते आणि अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. यावेळी तणाव निर्माण झाला होता.

पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याने वनोली, औंदाणे, तरसाळी, सटाणा परिसरातील शेती पाण्याअभावी संकटात सापडली आहे. शेतीसोबत शेत शिवारात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी दसाणा लघु प्रकल्पातून वाहून जाणारे पूर पाणी सुकड नाल्यात सोडावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. संबधित विभागाचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उदासीन दिसून येत आहेत. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. प्रहारचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनास सुरुवात झाली. सकाळी उपोषणकर्त्यांनी आवारात मंडप टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंडप टाकण्यास विरोध केला. यावेळी उपोषणकर्ते, अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अधिकाऱ्यांना अखेर नमते घ्यावे लागले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, तुषार खैरनार, पंचायत समितीचे माजी सभापती चिला निकम, सुधाकर पाटील, महेंद्र खैरनार ,दीपक रौंदळ आदी सहभागी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, वीरगाव लाभक्षेत्रातील शेतकरी राकेश देवरे, उद्धव देवरे, शिवाजी देवरे आदी शेतकऱ्यांनी पूर पाणी टाकण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. उपोषणकर्त्यांची मागणी दसाणा लघुप्रकल्पांतर्गत असलेल्या वीरगाव फड कालव्याच्या लाभक्षेत्राबाहेरील असल्याने हे उपोषण बेकायदेशीर असल्याचे जलसंपदा विभागच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.