नाशिक – देवळा-चांदवड मतदार संघात समावेश असलेल्या आणि शेतकरी संघटनेचे बालेकिल्ला असलेल्या विठेवाडी, झिरेपिंपळ येथे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा निर्यातबंदीमुळे सरकार विरूध्द फलक झळकावण्यात आले आहेत. ज्यांनी केली वारंवार शेतीमालाची निर्यात बंदी, त्यांना करु आता मतदान बंदी, असे आवाहन या फलकांव्दारे करण्यात आले आहे.

विठेवाडी आणि झिरेपिंपळ शिवारातील शेकडो कांदा उत्पादकांनी सत्ताधारी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी चुकीच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला आहे. ज्यांनी केली वारंवार शेतीमालाची निर्यातबंदी, त्यांनाच आता मतदानबंदी, अशा घोषणा देत तशा आशयाचा फलक लोह़णेर-कळवण या राज्यमार्गांवरील विठेवाडी येथील चौफुलीवर लावून निषेध व्यक्त करण्यात आला. सकाळी गावातील तरुणांनी भव्य फलक लावून त्याचे विधिवत पूजन केले.

हेही वाचा..नाशिक : मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा सुरळीत

गावकऱ्यांनी फलकांसमोर जुन्या उन्हाळी कांद्याची पूजा करुन केंद्र सरकारला सदबुध्दी सुचावी म्हणून संक्रांतीनिमित्ताने प्रार्थना केली. ज्यांनी आमच्या शेतीमालावर निर्यातबंदी केली, त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. घोषणाबाजी करुन निर्यातबंदी करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

शहरी भागातील मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी ग्रामीण भागातील कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले जात आहे. त्यामुळे संपूर्ण ताकदीसह विरोध करुन येणाऱ्या निवडणुकीत संघटित ताकद दाखवून दिली पाहिजे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी गावातील तरुण कांदा उत्पादकांना केले.

हेही वाचा…जानेवारीच्या मध्यावर गारवा, नाशिकमध्ये ११.१ नीचांकी तापमानाची नोंद

यावेळी विठेवाडी, झिरेपिंपळ गावातील शेकडो कांदा उत्पादक तसेच राजा शिवछत्रपती तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते निंबा निकम, प्रविण निकम यांच्या शिवप्रेमी मित्रमंडळाने लक्षवेधी फलक उभारला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम, मिलिंद निकम, नंदकिशोर निकम, संजय निकम आदी उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवळा तालुक्यातील विठेवाडी, झिरेपिंपळ गावातील कांदा उत्पादकांमध्ये केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणामुळे असंतोष आहे. त्यामुळे निर्यांतबंदी करणाऱ्यांना आता मतदान न करण्याचे आवाहन फलकांव्दारे प्रहार शेतकरी संघटनेने केले आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी त्वरीत उठविण्याची मागणी केली जात आहे.