अतिवृष्टीमुळे यंदा बागलाण तालुक्यातील शेतपिकांचे अतोनात नुकसान होऊनही बहुतांश शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहेत.विमाधारक सर्व शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सटाणा येथे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदुशेठ शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नाशिक: साखळचोंड दरीत पडून विद्यार्थ्याचा म़ृत्यू

२०२१-२२ या वर्षी बागलाण तालुक्यातील सुमारे २५ हजार शेतकऱ्यांनी डाळिंब, द्राक्ष, मका, बाजरी, सोयाबीन,कांदा, मठ, मुग, उडीद या पिकांसाठी विमा घेतलेला आहे. अतिवृष्टी तसेच प्रतिकूल हवामानामुळे सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. संबंधित विमा कंपनीकडे नुकसानीची तक्रार नोंदविल्यावर विमा कंपनीचे कर्मचारी संबंधित शेतात जाऊन पंचनामा करतील आणि त्यानंतर विम्याची रक्कम देण्याचे निश्चित करतील असे या संदर्भातील धोरण आहे. मात्र तक्रार करूनही बहुसंख्य ठिकाणी विमा कंपनीचे कर्मचारी पंचनाम्यासाठी पोहोचू शकले नसल्याने शेतकरी विमा भरपाईपासून वंचित ठरत आहेत. विमा कंपन्यांच्या दोषाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याची वस्तुस्थिती असताना संबंधित विमा कंपनीचे अधिकारी भ्रमणध्वनीलाही प्रतिसाद देत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

हेही वाचा >>>नाशिक: डिसेंबरपासून शहरात पुन्हा हेल्मेट सक्ती ; अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी पाऊल

बागलाण तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र महसूल मंडळाच्या ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापक उपकरणांच्या नोंदी गृहित धरण्याच्या पध्दतीचा फटका बसत असल्याबद्दलही शेतकऱ्यांचा रोष आहे. प्रत्येक महसुली मंडळाच्या ठिकाणी पर्जन्यमापक उपकरणे बसविण्यात आले आहेत. मंडळाच्या ठिकाणी कमी पर्जन्य झाले आणि त्याच मंडळातील काही अंतरावरील अतिवृष्टी झालेल्या अन्य गावांमध्ये पिकांना फटका बसुनही तेथील शेतकऱ्यांना विमा भरपाईपासून वंचित रहावे लागत आहे. अशाप्रकारे विमा घेऊनही या ना त्या कारणाने पीक नुकसानीची भरपाई न मिळणे ही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आहे,ज्या काही शेतकऱ्यांना भरपाई दिली जात आहे, ती तुटपूंजी आहे, अशा तक्रारी करत सर्व शेतकऱ्यांना विम्याची भरीव भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

आंदोलनात सुधाकर पाटील, संजय सूर्यवंशी, दीपक ठोके, नंदकिशोर शेवाळे, केतन सोनवणे, दिलीप भामरे, जालिंदर देवरे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers protest on the streets in satana for crop insurance compensation amy
First published on: 24-11-2022 at 18:18 IST