मालेगाव : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती संघटनेसह विविध संघटनानी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहरात मेहेर सिग्नल, आडगाव नाका येथे आंदोलन झाले. मालेगावमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी वडनेर तसेच मालेगाव शहराजवळील टेहरे चौफुलीवर आंदोलन केल्याने मालेगाव-नामपूर तसेच मालेगाव-सटाणा रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर झालेल्या आंदोलनाने वाहतूक विस्कळीत झाली.
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार दिव्यांग संघटना आणि शेतकरी संघटनांच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनास स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळून ठिकठिकाणी आंदोलन झाले. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांची हकालपट्टी करावी, शेतमालास भाव, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सक्तीची कर्जवसुली थांबविणे, आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मेहेर चौकात आंदोलन करण्यात आले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
मालेगाव तालुक्यात वडनेर येथे महादेव मंदिराजवळ संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले. सोयगाव चौफुलीवर शेतकऱ्यांच्या दुसऱ्या गटाने रस्त्यावर झोपून आंदोलन केले. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या ध्येय धोरणांवर टीका केली. ही धोरणे अशीच चालू राहिली तर, शेती व्यवसाय कसा टिकेल, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. या आंदोलनात दिनेश ठाकरे, लोहित ठाकरे, नीलेश ठाकरे, अमोल ठाकरे, चेतना देवरे आदी शेतकरी सामील झाले होते.
येवल्यात तासभर आंदोलन
येवला तालुक्यातील पुरणगाव येथे नाशिक-संभाजीनगर महामार्गावर सुमारे तासभर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा देत रस्त्यावर पत्ते खेळत कृषिमंत्र्यांच्या प्रतिमेला शाई फासली. महायुतीने निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांची मते मिळवली. सरकार स्थापन केले. परंतु, ज्या कारणाने शेतकऱ्यांनी मते दिली, त्या कर्जमाफीचा सरकारला सोईस्कर विसर पडला, याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. रास्ता रोकोमुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, संघटक किरण चरमल, युवा तालुकाध्यक्ष सुनील पाचपुते, उपाध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे आदी उपस्थित होते.
आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नाशिकरोड मालधक्क्यावर राजकारणामुळे प्रहार संघटनेला काम मिळू दिले जात नसल्याची तक्रार करीत संघटनेचे प्रमोद सोनकांबळे यांनी सातपूर येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर दुपारी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सोनकांबळे यांना ताब्यात घेतले. बच्चू कडू हे कामगारमंत्री असताना संघटनेला काम देण्याचे आदेश दिले होते. परंतु, कामगार उपायुक्त कार्यालयाने पाच वर्षात न्याय दिला नाही. कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार सोनकांबळे यांनी केली.