नाशिक : गोदाकाठावरील कपालेश्वर महादेव मंदिर सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. रविवारी दोन गुरवांमध्ये वादावादी झाली. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
गोदाकाठावरील श्री कपालेश्वर मंदिरात देखभाल, पूजा व त्रिकाल दिवाबत्ती हे कार्य परंपरेनुसासर गुरव (पुजारी) करत आले आहेत. यासंदर्भातील कामाचे मालकी हक्क व अधिकार तसेच वहिवाटीच्या अंमलबजावणीबाबत विभागणी झालेली आहे. त्यामध्ये काही गुरवांमध्ये वाद निर्माण झाल्याने प्रकरण थेट न्यायालयात गेले होते. वाद असलेल्या गुरवांच्या पूर्वजांनी रूढी परंपरा निश्चित केलेली आहे. वर्षाच्या ३६५ दिवसांचे विभाजन (सत्र) करण्यात आले आहे.
न्यायालयीन कामकाजात दोन्ही बाजूंच्या गुरवांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली होती. न्यायालयाने प्रतिवादींना दाव्याचा निकाल लागेपर्यंत तात्पुरत्यारित्या गुरववृत्तीचे रूढी परंपरेनुसार ठरलेल्या कालावधीमध्ये व पाळ्यांचा पदभार देण्यामध्ये अडथळा व हरकत करू नये, असे आदेश दिले होते. तरी देखील हेमंत उर्फ पप्पू गाडे यांनी रविवारी सकाळी अनिल भगवान या गुरवांची पाळी असताना मंदिर हस्तांतरण केले नाही. यावेळी गाडे आणि भगवान कुटुंबियांमध्ये शाब्दिक वाद निर्माण होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला.
न्यायालयाने तात्पुरत्यारित्या परंपरेनुसार चालू असलेले कामकाज सुरु ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरदेखील हेमंत उर्फ पप्पू गाडे यांच्याकडून मंदिर हस्तांतरणाच्या वेळी अडचणी निर्माण केली जात असल्याने एकप्रकारे गाडे यांच्याकडून न्यायालयाचा अवमान केला जात असल्याची भावना इतर गुरव मंडळींकडून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षी देखील गाडे यांनी याच अनिल भगवान यांना मंदिर हस्तांतरण करतांना दानपेटीच्या दानावरून हाणामारी केल्याची घटना घडली होती. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेत अंतिम निकाल द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गुरवांमधील अंतर्गत वाद आहे. मंदिराचा ताबा घेण्यावरून हा वाद झाला. यामुळे हे प्रकरण मारामारी पर्यंत पोहचले.- विलास पाटील (मंदिर देवस्थान धर्मादाय उपायुक्त)