नाशिक : नाशिकहून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसने सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नरलगतच्या माळवाडी शिवारात अकस्मात पेट घेतला. चालकाने प्रसंगावधनता दाखवित बस रस्त्याच्या बाजुला नेऊन सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर काही वेळात बस भस्मसात झाली. या घटनेमुळे शिवशाही बसच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… मालेगावात ५० अतिक्रमणांवर हातोडा, रहदारीला होणारा अडथळा दूर होण्यास मदत

महिनाभरापूर्वी नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील खासगी प्रवासी बस आणि डंपर यांच्या अपघातात बसला आग लागून १३ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना प्रवासी बसने पेट घेण्याची ही दुसरी घटना घडली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले. नाशिक-पुणे हा राज्य परिवहन महामंडळाला चांगले उत्पन्न देणारा मार्ग आहे. या मार्गावर अधिक्याने शिवशाही बस चालविल्या जातात. बुधवारी सकाळी सात वाजता ४२ प्रवाशांना घेऊन शिवशाही बस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. सिन्नरच्या माळवाडी शिवारापर्यंत बस गेली असताना मागील बाजूने धूर निघू लागला. मागून येणाऱ्या अन्य वाहनधारकाने त्याबाबत माहिती दिल्यावर चालक अमित खेडेकर (४१) यांनी बस रस्त्याच्या कडेला नेऊन उभी केली. प्रवाशांना तातडीने बसमधून खाली उतरण्यास सांगितले. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन पाच ते सहा मिनिटांत सर्व प्रवासी खाली उतरले. काही वेळात बस आगीच्या विळख्यात सापडली. धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर नगरपालिका, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु, तोपर्यंत बस पूर्णत: खाक झाली होती. केवळ तिचा सांगाडा शिल्लक राहिला.

हेही वाचा… नाशिक: शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी मुंबई पोलिसांची मदत; ५० अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

आगीमुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. बसला लागलेल्या आगीचे रौद्ररुप पाहून सुखरूप बचावलेले प्रवासी धास्तावले. या ४२ प्रवाशांना मागून येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाहीमधून पुण्याकडे मार्गस्थ करण्यात आले. दरम्यान, महामंडळाकडून चालविल्या जाणाऱ्या वातानुकूलीत शिवशाही बस दोन प्रकारच्या आहेत. खासगी कंपनीकडून घेतलेल्या काही बस असून काही महामंडळाच्या स्वत:च्या आहेत. सिन्नरजवळ पेटलेली बस राज्य परिवहन महामंडळाची होती. या घटनेमुळे त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

दुर्घटनेची चौकशी सुरू

सिन्नरजवळ पेटलेली शिवशाही बस पुणे आगाराची होती. तिला आग कशी लागली, याची चौकशी सुरू असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारणांची स्पष्टता होईल. जळालेल्या बसला आगारात आणून तिची तपासणी केली जाईल. नाशिक जिल्ह्यात एकूण ५६ शिवशाही बस आहेत. शिवशाही बसच्या दररोज, साप्ताहिक आणि दोन महिन्यातून एकदा अशा तीन तपासण्या स्थानिक कार्यशाळेत केल्या जातात. अन्य आगारातून येणाऱ्या शिवशाही बसची मूळ जिल्ह्याच्या कार्यशाळेत तपासणी होते. – अरुण सिया (विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at shivshahi st bus 42 passengers safe due to alertness of driver asj
First published on: 02-11-2022 at 14:14 IST