मालेगाव : शहरातील गुलशननगर भागातील सुन्नी मशीदीजवळ गुंडांकडून गोळीबार व प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली आहे. यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहरात गुंडांकडून वारंवार गोळीबाराच्या घटना घडत असल्याने त्यांना कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
शेख अनिस शेख रशीद उर्फ अनिस मटकी (४१) असे गोळीबार व हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनिस हा घराकडे जात असताना समोरून आलेल्या पाच जणांनी त्याच्यावर हल्ला चढविल्याचा संशय आहे. संशयितांकडे गावठी बंदूक आणि धारदार हत्यार होते. त्याद्वारे त्यांनी प्रथम गोळीबार केला आणि नंतर हत्यार व लोखंडी पाईपने वार केले. हल्ल्यात अनिस हा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला आधी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर फरहान हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने नंतर धुळे येथील रुग्णालयात त्याला हलविण्यात आले.
अनिस व रब्बानी दादा यांच्यामध्ये वाद होते. त्यातून रब्बानी व त्याच्या साथीदारांकडून हा हल्ला झाल्याची तक्रार अनिसच्या नातेवाईकांनी केली आहे. हल्ल्याची माहिती समजल्यावर सामान्य रुग्णालय तसेच फरहान रुग्णालयाबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तेजबिरसिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन, पोलीस निरीक्षक आर. एस. खताळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी जब्बार नामक व्यक्तीसह अन्य चार अनोळखी संशयितांविरोधात पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सर्व संशयित फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
गोळीबाराच्या वाढत्या घटना
गेल्या महिन्यात अख्तर काल्या या सराईत गुन्हेगाराने किरकोळ कारणावरून सख्ख्या भावावर गोळीबार केल्याचा प्रकार शहरात घडला होता. पोलिसांनी त्याला चाळीसगाव येथून जेव्हा अटक केली, तेव्हा त्याच्याकडे गावठी पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली होती. तत्पूर्वी चाळीसगाव फाट्यावरील एका हॉटेलजवळ खालिद खान अब्दुल रहेमान या व्यापाऱ्याच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत एक गोळी मांडीला चाटून गेल्याने व दुसरी गोळी चुकल्याने खान हे थोडक्यात बचावले होते. वारंवार घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.