जळगाव – पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी उधना-ब्रह्मपूर दरम्यान एक नवीन अमृत भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून धावणाऱ्या उधना-भुसावळ मार्गावरील या पहिल्या अमृत भारत एक्स्प्रेसमुळे नंदुरबारसह धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होऊ शकणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून उधना ते भुसावळ मार्गावर प्रथमच सुरू होत असलेल्या अमृत भारत एक्सप्रेसला शनिवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हर्च्युअल पद्धतीने तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव प्रत्यक्ष हिरवा झेंडा दाखवत आहेत. ही गाडी गुजरातमधील उधनापासून ओडिशातील ब्रह्मपूरपर्यंत धावेल. ०९०२१ उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्सप्रेस शनिवारी सकाळी १०.५० वाजता उधना स्थानकावरून सुटेल, तर ०९०२२ ब्रह्मपूर-उधना अमृत भारत एक्सप्रेस दुपारी १२ वाजता ब्रम्हपूर येथून सुटणार आहे. ही गाडी सुरत आणि आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य कामगारांसाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. त्यांना सुरक्षित, जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. अमृत भारत एक्सप्रेसचे उद्दिष्ट सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना आरामदायी प्रवास प्रदान करणे आहे. विविध सुविधांनी परिपूर्ण परंतु नियंत्रित प्रवास भाडे असलेली, ही गाडी सामाजिक-आर्थिक समावेशाचे प्रतीक असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

उधना ते ब्रम्हपूर दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला तब्बल ११ सामान्य (अनारक्षित) श्रेणी आणि आठ स्लीपर व इतर डबे जोडले जाणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणे आधुनिक आसने आणि झोपण्याची सोय देखील असणार आहे. नवीन अमृत भारत एक्सप्रेस आधुनिक सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. विशेषतः नॉन-एसी स्लीपर आणि सामान्य श्रेणीतील प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. १,८०० हून अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी ही गाडी १३० किमी प्रतितास वेगाने धावेल. सुरक्षेसाठी सर्व डबे सीसीटीव्हीने सुसज्ज असतील. प्रवास भाड्यात इतर नियमित रेल्वे गाड्यांच्या तुलनेत थोडीशी वाढ होणार असून, ती वेगवेगळ्या वर्गांना लागू होईल.

पाच ऑक्टोबरपासून उधना ते ब्रम्हपूर दरम्यान अमृत भारत एक्सप्रेस आठवड्यातून एक दिवस दर रविवारी नियमितपणे धावणार आहे. उधना येथून ती सकाळी ०७.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०१.५५ वाजता ब्रम्हपूरला पोहोचेल. याशिवाय, ब्रम्हपूर ते उधना ही गाडी सहा ऑक्टोबरपासून दर सोमवारी रात्री ११.४५ वाजता सुटेल आणि बुधवारी सकाळी ०८.४५ वाजता उधना पोहोचेल. दोन्ही गाड्यांना खान्देशातील नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, शिंदखेडा, अमळनेर, धरणगाव, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.