जळगाव – जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी गेलेले चार जण शनिवारी ठिकठिकाणी पाण्यात बुडाल्याचे उघडकीस आले होते. त्यापैकी जळगाव तालुक्यातील गिरणा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह चार दिवस उलटले तरी सापडले नव्हते. मात्र, बुधवारी पाचव्या दिवशी एकाचा मृतदेह जळगाव शहरालगतच्या सावखेडा शिवारात आढळून आला.

गणेश गंगाराम कोळी (२७, रा. ममुराबाद, ता. जळगाव) हा त्याचे आई-वडील आणि बहीण यांच्यासोबत पाळधी-तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर नव्याने उभारलेल्या गिरणा नदीवरील पुलाखाली घरगुती गणेश विसर्जनासाठी गेला होता. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मूर्तीसह नदीत उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.

गणेशला वाचविण्यासाठी आजुबाजुच्या लोकांनी तसेच कुटुंबियांनी आरडाओरड केली. परंतु, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने कोणीच त्याला वाचवू शकले नाही. दुसऱ्या घटनेत जळगाव शहरालगतच्या गिरणा नदीत गणेश विसर्जनासाठी गेलेला राहुल रतिलाल सोनार (३४, रा. वाघनगर) हा शनिवारी दुपारी चार वाजता बुडाला होता.

गेल्या चार दिवसांपासून गिरणा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध तालुका पोलीस तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घेत होते. अखेर पाचव्या दिवशी बुधवारी दुपारी सावखेडा शिवारातील गिरणा नदीच्या पात्रात राहुल सोनार याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

नातेवाईकांकडून ओळख पटविण्यात आल्यानंतर मृतदेहाची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. ममुराबाद येथील गणेश कोळी याच्या मृतदेहाचा शोध अजुनही लागलेला नाही. त्याचा शोध पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथक घेत आहे.

गिरणा धरणातून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने गणेश कोळी याच्या शोध कार्यात बरेच अडथळे आले. नदीच्या काठावरील आव्हाणे, आव्हाणी, खेडी, वडनगरी, फुपनगरी तसेच कानळदा गावालगतच्या किनाऱ्यांवरही त्याचा शोध घेण्यात आला. पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर गिरणा धरणात ९६ टक्क्यांवर पाणी साठा झाला आहे.

परिणामी, पाटबंधारे विभागाकडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते. ज्यामुळे नदीत सुमारे ९७६८ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. परंतु, पाण्याची आवक कमी झाल्याने आता गिरणा धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे गणेश विसर्जनापासून बेपत्ता असलेल्या गणेशच्या मृतदेहाचा शोध घेताना पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन पथकाला येणारे अडथळे दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.