जळगाव – महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने शहरात राबविलेल्या मोहिमेत पाच-सहा ट्रॅक्टरभर लोखंडी पेट्यांसह विक्रेत्यांच्या हातगाड्या, तसेच विविध फळे, कापडाचे गठ्ठे, असा सुमारे आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यापुढेही अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू राहणार असल्याचे उपायुक्त गणेश चाटे यांनी सांगितले.  शहरातील फुले व्यापारी संकुल, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलासह गोलाणी व्यापारी संकुल परिसरात महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त चाटे, संजय ठाकूर, उमाकांत नश्ते, साजीद अली, नितीन ठाकरे, नाना कोळी आदींच्या पथकाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली.

हेही वाचा >>> मनमाड : मातेची बालिकेस मारहाण, समाजसेवकाच्या सतर्कतेमुळे सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहिमेत रस्त्यांच्या दुतर्फा लागलेल्या विविध खाद्यपदार्थांसह फळे विक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. फुले व्यापारी संकुल आवारातील वाहनतळातील बसलेल्या कपडे विक्रेत्यांच्या नऊ लोखंडी पेट्या, १५ ते २० कापडाचे गठ्ठे, क्रीडा संकुल परिसरातील खाद्यपदार्थांच्या सात हातगाड्या, गोलाणी व्यापारी संकुल परिसरातील फळ विक्रेत्यांच्या १० हातगाड्या असा माल जप्त करण्यात आल्याचे विभागाचे अधिकारी संजय ठाकूर यांनी सांगितले.  शहरात विविध विक्रेत्यांच्या हातगाड्यांच्या अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा समजल्या जाणार्या फुले व्यापारी संकुल, क्रीडा संकुल, गोलाणी व्यापारी संकुलासह कोर्ट चौक ते गणेश कॉलनी रस्त्यालगत विविध वस्तू, फळे, भाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा अक्षरश: वेढा पडला आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून, लहान-मोठ्या अपघातांचाही धोका वाढला आहे.