धुळे : परिसरात वाढत्या वन्यजीव गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वनविभाग आणि पोलीस विभागाने एकत्र येत संयुक्त गस्त, नाकाबंदी आणि वाहन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा उद्देश मानव–वन्यजीव संघर्ष रोखणे आणि वनक्षेत्रातील गुन्हे थांबवणे हा आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज धुळे जिल्हास्तरीय व्याघ्नकक्ष समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला धुळे जिल्हास्तरीय व्याघ्नकक्ष समितीच्या बैठकीला उप वन संरक्षक एम. बी. नाईकवाडी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, आर. आर. सदगीर, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, वन्यजीवविभागाचे कैलास सोनवणे, वन्यजीव रक्षक योगेश वारुडे, उमाकांत पाटील, सुधीर खैरनार व चेतन बोरसे आदी उपस्थित होते.

प्रभावित भागात नियमित संयुक्त गस्त व वाहन तपासणी करून शिकार, अतिक्रमण आणि अवैध कृत्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. दोन्ही विभाग समन्वयाने काम करतील असे यावेळी ठरविण्यात आले आहे. वनअधिकाऱ्यांना अद्याप शस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण नाही. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये त्यांना शस्त्र प्रशिक्षण व गोळीबार सराव दिला जाणार आहे. यामुळे अधिकारी आत्मसंरक्षणास सक्षम होतील आणि गुन्हेगारांवर वचक बसेल अशी अपेक्षा आहे.

वनक्षेत्रातील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस विभागाच्या मदतीने संयुक्त नियोजन करण्यात येणार असून ज्या भागात अतिक्रमण झाले आहे, तिथे संयुक्त पथक कारवाई करेल. वन्यजीवांच्या शिकारींच्या वस्त्या आणि पाडे कुठे तयार होत आहेत याची माहिती घेऊन संयुक्त कारवाई केली जाईल. शिकारसाहित्य, जाळी, सापळे आदी जप्त करून गुन्हे दाखल केले जातील.

सर्पमित्रांची नोंदणी करून त्यांना प्रशिक्षण दिले जाईल तसेच ‘सर्पमित्र’ नावाचे अ‍ॅप तयार करण्यात येईल, ज्यायोगे साप पकडण्याच्या घटनांमध्ये त्वरीत मदत मिळू शकेल. वाहनांच्या धडकेमुळे वन्यजीव मृत्यूमुखी पडत असलेल्या लळींग, साक्री, बोराडी आदी परिसरात सावधगिरीचे फलक (साईन बोर्ड) लावले जातील. वाहनचालकांना वन्यजीवांच्या उपस्थितीबाबत इशारा मिळेल. आवश्यकतेनुसार वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने प्राथमिक प्रतिसाद पथक (पी.आर.टी.) तयार केले जाईल. आपत्कालीन परिस्थितीत हे पथक तत्काळ मदत करेल.

वनविभागाकडून वन्यजीव गुन्ह्यातील आरोपींची यादी तयार करण्यात येईल. या आरोपींवर पोलीस विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल. गावकऱ्यांपर्यंत जनजागृती पोहोचवण्यासाठी वनविभाग ग्रामीण आणि अहिराणी भाषेत लघु व्हिडिओ (रिल) तयार करेल. यामध्ये वन्यजीव संरक्षणाबाबत उपयुक्त माहिती दिली जाणार असून शहरालगतच्या पोल्ट्री फार्ममधून टाकण्यात येणारा जनावरांचा कचरा वन्यजीवांना आकर्षित करतो व त्यामुळे संघर्ष निर्माण होतो. संबंधित फार्म मालकांना लेखी सूचना देऊन योग्य निस्सारण पद्धती अवलंबण्याचे आदेश दिले जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वनविभागाने तात्पुरत्या वनचौक्या उभारण्याचा निर्णय घेतला असून ज्या भागात वारंवार वनसंबंधित गुन्हे होतात त्या ठिकाणी आता या चौक्या कार्यरत राहतील अशी माहिती देण्यात आली आहे.

शिरपूर परिसरात बेकायदेशीर गांजा लागवड रोखण्यासाठी वनविभाग व पोलीसांची संयुक्त कारवाई होणार आहे. तपास आणि आवश्यक ती कायदेशीर पावले उचलली जाणार असून धुळे शहरात काळवीट आणि इतर वन्यप्राण्यांचे मांस विक्री होत असल्यास अशा घटनांवर प्रतिबंधक कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे याशिवाय लळींग परिसरात एअरगनच्या साहाय्याने शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

या सर्व उपाययोजनांमुळे धुळे आणि परिसरात वन्यजीवांचे रक्षण अधिक प्रभावी होईल तसेच मानव–वन्यजीव संघर्ष कमी होईल, असा विश्वास वनविभाग आणि पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.