नाशिक : वडनेर दुमाला परिसरात बिबट्याच्या मुक्त संचारात तीन वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांच्या मोर्चाला ४८ तासांहून अधिक कालावधी लोटत असतांना याच भागातून मागील दोन दिवसांत पुर्ण वाढीचा एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सोमवारी पहाटे या परिसरात दुसरा बिबट्या भवानी नगर परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

नाशिकरोड परिसरात वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या आयुषचा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मृत्यू झाला. त्याच्या मृत्युने ग्रामस्थांच्या रोषाला वाट मोकळी करून दिली. वडनेर दुमालासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकत्र येत वनविभागाच्या कार्यालयावर बिबट्याला जेरबंद करावे, या मागणीसाठी मोर्चा काढला होता. बिबट्याला पकडा अन्यथा वन मंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा सज्जड दम मोर्चातून वनअधिकाऱ्यांना भरण्यात आला. अवघ्या २४ तासात या परिसरात एक बिबट्या शुक्रवारी जेरबंद करण्यात आला. दुसरीकडे बिबट्या जेरबंद व्हावा, यासाठी वनविभागाच्या वतीने फिरते कॅमेरे, १५ हून अधिक पिंजरे लावण्यात आले.

यातील एक पिंजरा पिंपळगाव खांब या परिसरात लावण्यात आला होता. येथील बाळू जाधव यांच्या शेतातील पेरूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. पहाटे बिबट्याच्या डरकाळीने ग्रामस्थांना जाग आली. या बाबत ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वनविभागाने घटस्स्थळी जात बिबट्यास ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी म्हसरूळ येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात दाखल केले. दरम्यान, वनविभागाच्या वतीने वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, वडाळा आणि इंदिरा नगर परिसरातही बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावले आहे. सोमवारी जेरबंद झालेल्या बिबट्याचा वैद्यकीय अहवाल सायंकाळी उशीराने प्राप्त होणार असल्याचे वनअधिकारी यांनी सांगितले.

वनविभागाचे आवाहन

बिबट्या शेतमळा परिसरातून आता नागरी वस्तीत येत आहे. भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेला बिबट्या पशुधनानंतर आता माणसांकडे मोर्चा वळवत आहे. नागरिकांनी याबाबत खबरदारी बाळगावी, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये नागरिकांनी रात्री किंवा पहाटे एकटे बाहेर पडू नये, आपल्याबरोबर काठी आणि उजेड दाखवणारी विजेरी असावी, लहान मुलांना अंगणात खेळण्यासाठी एकटे सोडू नये, शेतात घर असेल तर घरापासून पीक अंतरावर राहु द्या तसेच घराला कुंपण करा, मुलांना खेळण्यासाठी जाळीचे बंदिस्त कुंपण तयार करा, घराच्या अवती भोवती मोठ्या उजेडाचे दिवे लावा, उघड्यावर नैसर्गिक विधीसाठी बसतांना काळजी घ्या, पशुधनही बंदिस्त गोठ्यात ठेवा , रात्री समूहाने फिरा आवाज मोठा असू द्या, घरासमोर कचरा टाकू नका आदी सुचना करण्यात आल्या आहेत.