जळगाव – जिल्ह्यातील दोन माजी मंत्री तसेच दोन माजी आमदारांनी पक्ष सोडल्याने बसलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी (शरद पवार) जेमतेम सावरली होती. त्यानंतर आता रावेरचे माजी आमदार अरूण पाटील यांनीही भाजपमध्ये मंगळवारी समर्थकांसह प्रवेश करून राष्ट्रवादीला आणखी दुसरा धक्का दिला आहे.

भाजपमध्ये असताना रावेरचे दोन वेळा विधानसभेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी अरूण पाटील यांना मिळाली होती. मात्र, २००९ मध्ये त्यांनी काही कारणांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून राष्ट्रवादीत स्थिरावलेल्या पाटील यांनी पक्षात फूट पडल्यानंतरही शरद पवार गटाची साथ दिली होती. मात्र, पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण आणि त्यामुळे वाढलेली दुफळी लक्षात घेता ते अलिकडच्या काळात शरद पवार गटात फार सक्रीय दिसत नव्हते. विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी पक्षाच्या बैठकांमध्येही हजेरी लावणे जवळपास थांबवले होते.

माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील आणि दिलीप सोनवणे यांनी शरद पवार गट सोडून अजित पवार गटात प्रवेश केला, तेव्हा सुद्धा माजी आमदार अरूण पाटील हे शरद पवार गट सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात, त्यांनी अन्य दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याऐवजी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मंगळवारी आपल्या समर्थकांसह त्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, रावेरचे आमदार अमोल जावळे, रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख नंदू महाजन, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

माजी आमदार पाटील यांच्या बरोबर राष्ट्रवादीतील (शरद पवार) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मुरलीधर तायडे, माजी सदस्य आत्माराम कोळी, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंदार पाटील, विकास सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, निंभोरा येथील माजी सरपंच सचिन महाले, शिंगाडीचे माजी सरपंच महेंद्र बागडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सर्वांच्या भाजप प्रवेशामुळे रावेर तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार पडले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद त्यामुळे वाढल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे गुरूवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणुकांची चर्चा करण्यासाठी पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वीच, माजी आमदार पाटील यांनी धक्का दिल्याने त्याचे पडसाद शरद पवार गटाच्या बैठकीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.