नाशिक – शहर परिसरातील गुन्हेगारीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी गुंडांकडून नाशिक जिल्हा -कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेतले. मात्र समाजकंटकांची दहशत थांबण्याचे नाव घेत नाही. जेलरोड -शिवाजी नगर परिसरात युवकाला कोयते आणि तलवारीचा धाक दाखवून लूट करणाऱ्या तसेच म्हसोबा मंदिराजवळ गाड्यांची तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांना नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी रिक्षाचालक तसेच प्रवासी असे रुप धारण केले होते.

कोयता गँगकडून झालेल्या या हल्ल्याची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदींनी तातडीने तपास सुरु केला. हवालदार विशाल पाटील आणि महेंद्र जाधव यांना काही संशयित साईनगर येथील मोकळ्या मैदानावर येणार असल्याची माहिती मिळाली. संशयित आडदांड असल्याने पथकाने युक्ती आखली. हवालदार विशाल पाटील हे रिक्षाचालक तर महेंद्र जाधव, सागर आडणे, अरूण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे हे प्रवासी बनले.

संशयितांचा ठावठिकाणा निश्चित झाल्यावर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने रिक्षा थेट त्यांच्याजवळ नेण्यात आली. संशयित बेसावध असल्याचे लक्षात येताच त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत हल्लेखोर राकेश उर्फ राका लोंढे, प्राजंल उर्फ पज्या गुंजाळ, प्रथमेश उर्फ नन्या शेलार आणि एका अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून लुटलेला ऐवज, तसेच सहा ते सात धारदार कोयते, तलवारी आणि इतर हत्यारे जप्त करण्यात आली. अन्य फरार पाच जणांचा शोध सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विजय टेमघर, महेंद्र जाधव आदींनी केली.

सापळा असा रचला

काही महिन्यांपासून शहरात अनेक ठिकाणी लूट करण्यासाठी कोयत्यांचा वापर करण्यात येत आहे. नाशिकरोड परिसरात दहशत माजवण्यासाठी काहींनी कोयत्यासह अन्य धारदार शस्त्राचा वापर करत वाहनांची तोडफोड केली. कोयत्याचा धाक दाखवत लुटमार केली. या घटनांमधील सुत्रधार एक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणातील संशयित हे चलाख असल्याने पोलिसांनी माहितीची खातरजमा करत बहुरूपीचे सोंग घेतले. त्यांनी रिक्षा चालक तसेच प्रवाशांचे सोंग घेत संशयितांना गाठले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रिक्षा थेट त्यांच्यापर्यंत नेत त्यांना गाफील ठेवले. त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत ताब्यात घेतले.