धुळे – येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात अधिकाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देतानाच आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयातही आत्याधुनिक दर्जाच्या कार्डियाक कॅथलॅबसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील पहिले कार्डियाक कॅथलॅब युनिटचे लोकार्पण १३ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्हा रुग्णालयात सुमारे १८ कोटी रुपये खर्च करुन हे अत्याधुनिक कॅथलॅब युनिट तयार करण्यात आले आहे. याशिवाय रुग्णालयात लवकरच वेगवेगळे चार नवे विभागही सुरू करण्यात येणार आहेत. रुग्णाने त्याच्याकडील आधारकार्ड दाखवले की वैद्यकीय तपासणीनंतर आवश्यक असल्यास संबंधित रुग्णाच्या ईसीजीपासून ते हृदयरोग निदान करण्यापार्यंतच्या सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय आवश्यकतेनुसार हृदयाशी संबंधित सेवाही (अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी) मोफतच दिल्या जाणार आहेत.
राज्यात वेगवेगळ्या १४ ठिकाणी अशाच पद्धतीच्या युनिट्सचे काम सुरू असून धुळ्यात उभारले जाणारे त्यातीलच एक पहिले युनिट आहे. रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागात १० खाटा असून याठिकाणी जवळपास सहा कोटी रुपयांची अद्ययावत यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे. यावरूनच आधुनिक वैद्यकीय सेवा सुविधेचा अंदाज येऊ शकेल. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यावर प्रारंभी शहरातून काही संघटनानी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला होता. या सर्व वैद्यकीय सेवा धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयातही उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.
अखेर आहे त्याच ठिकाणी शंभर खाटांचे रुग्णालय उपलब्ध करून देण्यात आले. आणि आवश्यक वैद्यकीय सेवा सुरु करण्यात आल्या. तेंव्हापासून म्हणजे जुलै २०२१ पासून जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदनगृह बंद होते. त्यामुळे केवळ शवविच्छेदन करण्यासाठी पाच किलोमीटरचा प्रवास करुन भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जावे लागत होते.
हिरे रुग्णालयात दररोज सहा तर वर्षाला १२०० शवविच्छेदन होतात. आता शहरातील जिल्हा रुग्णालयातच शवविच्छेदनगृह उभारल्यामुळे या कामासाठी हिरे रुग्णालयापर्यंत जाण्याची गरज राहणार नाही. उपलब्ध झालेले १०० खाटांचे रुग्णालय गर्भवतींसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. स्वतंत्र कक्षात एकावेळी १२ नवजात बालकांवर उपचार होतील, अशी सोय करण्यात आली आहे.
कॅथलॅब युनिटसोबतच याच रुग्णालयाच्या आवारात स्त्री रुग्णालय,अत्याधुनिक अपघात विभाग आणि शवविच्छेदनगृह यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, वीज, पाणी पुरवठा आणि अन्य कामे प्रगतीपथावर आहेत. यामुळे अन्य तीन विभागांचे लोकार्पण लांबण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री आबिटकर हे जिल्हा दौऱ्यावर आल्यावर या तिन्ही विभागांची पाहणी करतील. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, डॉ. महेश भडांगे, डॉ. रवी सोनवणे, डॉ. स्वप्निल सांगळे आदी या कामाच्या पूर्ततेसाठी विशेष लक्ष ठेऊन आहेत.
धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना अत्याधुनिक दर्जाच्या अधिकाधिक सेवा, सुविधा मिळाव्यात, हे शासनाचे धोरण आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांसाठी या ठिकाणी वैद्यकीय सेवेची उपकरणे उभारण्यात आली आहेत. ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्याबरोबर रुग्णांना त्याचा लाभ घेता येईल. – डॉ. दत्ता देगावकर (जिल्हा शल्य चिकित्सक, धुळे).