नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपुढील अडचणी सोडविण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले आहे. पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या. भुजबळ यांनी या प्रश्नांविषयी दोन दिवसात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची अलीकडेच बैठक झाली. या बैठकीतही मंडळ पदाधिकाऱ्यांकडून अनेक मागण्या मांडण्यात आल्या. महापालिका प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाहीचे आश्वासन देण्यात न आल्याने पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांची भेट घेतली.

गणेश विसर्जन मिरवणूक नाशिकमध्ये रात्री बारा वाजल्यानंतर विसर्जित करावी लागते. रात्री बारानंतरही पारंपरिक पध्दतीने वाद्य शेवटच्या गणपतीचे विसर्जन होईपर्यंत वाजवू देण्यात यावे, गणेशोत्सवात जुने नाशिकसह अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, धुमाळ पॉईंट, पंचवटीतील गावठाणातील रस्ते या ठिकाणी अवजड वाहनांसह अन्य वाहतूक बंद करण्यात यावी, मंडळांना वीज देयके हे कुठलेही रिडींग न देता दिली जातात. चुकीची देयक आकारणी मंडळाकडून केली जाते. ही जुलूमी पध्दत बंद करण्यात यावी. महावितरणने गणेश मंडळांना सहकार्य करावे, गणेशोत्सवात खाद्यपदार्थाची दुकाने एक ते दीड वाजेपर्यंत उघडी ठेवावीत, यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना खाण्याची काही व्यवस्था होईल. मूर्ती स्थापन करण्याच्या दिवसापर्यंत मंडळांना परवानगी देण्यात यावी, आदी मागण्या छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आल्या.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी भुजबळ यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती दिली. मंत्री म्हणून त्यांची भेट घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा केली. मंडळांकडून वीज वितरण कंपनी व्यावसायिक दर आकारते. मंडळांना घरगुती दराने देयक द्यावे, मंडळाचे देखावे रात्री १२ पर्यंत खुले राहु द्यावे, विसर्जन मिरवणूक शेवटचा गणपती विसर्जित होईपर्यंत चालु राहु द्यावी, यासह अन्य काही मागण्यांविषयी चर्चा केल्याचे शेटे यांनी सांगितले. भुजबळ यांनी या सर्व अडचणींची, प्रश्नांची माहिती घेत दोन दिवसांत चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे शेटे यांनी नमूद केले. यावेळी माजी आमदार वसंत गीते, शिवसेवा गणेश मंडळाचे विनायक पांडे, गणेश बर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते.