जळगाव : राजकारणात विरोधक असलाच पाहिजे. विरोधकांची टीका कधीही फायद्याची असते आणि त्याच्यामुळे आपण सुधारतो. आमच्यावरही टीका होत असते. आमचे कामच आहे टीका ऐकायचे. पाच-सहा वेळा निवडून आलो आहोत आणि आणखी मैदानात उतरण्यास तयार आहोत. येथे गुंड लोक तीन-तीन वेळा निवडून येतात, आणखी काय पाहिजे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात लोकप्रतिनिधींना हाणला.
जिल्ह्यातील चोपडा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शनिवारी पार पडले. आपल्या नेहमीच्या विनोदी शैलीत जोरदार फटकेबाजी त्यांनी केली. प्रसंगी व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना सुद्धा टोले हाणले. यावेळी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक घनःश्याम अग्रवाल, पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम आदी उपस्थित होते. दरम्यान, गुंड लोक तीन-तीन वेळा निवडून येतात, असे खळबळजनक वक्तव्य पालकमंत्री पाटील यांनी भाषणात केले. माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू नका. या टीव्हीवाल्यांचे काही खरे नाही, गुलाबराव पाटील त्यांच्याच आमदाराला बोलले गुंड, असे दाखवतील. जो मुख्य भाग आहे तो कापून टाकतील. कशामुळे बोलले का बोलले ते सांगणार नाहीत, असे बोलून नंतर त्यांनी सारवासारव केली.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, की सांगायचा अर्थ असा आहे की लोक असे वेगळे नाहीत. जे सरळ निवडून देतील. पहिल्यांदा निवडून येणे फार सोपे असते. पहिल्या वेळी कोरी पाटी असते. मागच्याने काहीच काम केलेले नसते. सकाळी अकराला तो उठतो आणि त्याची दिनचर्या बाराला सुरू होते. म्हणून त्याला लोक कंटाळलेले असतात. गावात कधी दिसला नाही म्हणून दुसऱ्याला मतदान देतात. पण दुसऱ्या वेळेस तुम्ही किती सक्रीय आहात, हे पाहुन लोक निवडतात. तिसऱ्या-चौथ्या वेळेस आणखी जास्त कठीण परीक्षा असते. सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन सातत्याने निवडून येतो, तो लोकांनी मान्य केलेला नेता असतो. आम्ही बरेच चढ उतार पाहिले. वर्षभर गद्दार शब्द ऐकला. अजुनही कानातून तो शब्द जात नाही.
गुंड लोक तीन-तीन वेळा निवडून येतात, आणखी काय पाहिजे, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात लोकप्रतिनिधींना हाणला.https://t.co/2jrmCKw8Ui#Shivsena pic.twitter.com/QCbGz3WYT9
— LoksattaLive (@LoksattaLive) October 5, 2025
दरम्यान, जिल्ह्यातील भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती करण्यासंदर्भात असलेल्या धोरणावर पालकमंत्री पाटील यांनी टीका केली. भाजप नेते आम्हाला जाहीरपणे युती करायची आहे, असे सांगतात. परंतु, एकांतात स्वबळाची भाषा बोलतात. जिल्हा परिषद निवडणुकीत सध्या वेगवेगळे वारे वाहत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती होते, तशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये का नाही? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. युती झाली नाही तर कार्यकर्ते मरून जातील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी भाजपला युती करण्याचे आवाहन केले.