नाशिक – समस्त भक्तांचे लाडके दैवत विघ्नहर्ता श्री गणरायाला अनंत चतुर्दशी दिनी निरोप देण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर उद्या जड अंतकरणाने गणपती बाप्पांचे विसर्जन होणार असून विसर्जन सुरळीत व्हावे, यासाठी पोलीस आणि नगरपालिका प्रशासनासह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

गणपती बाप्पा मोरया अशी आर्त हाक देत घरोघरी मंत्रोच्चारात बाप्पा विराजमान झाला. दहा दिवस उत्सव निमित्त शहर परिसर तसेच जिल्हा परिसरात विविध उपक्रम, स्पर्धा झाल्या. शनिवारी अनंत चर्तुदशी दिनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळाकडून विर्सजन मिरवणुक काढण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने विर्सजन मिरवणुकीत २०हून अधिक मंडळे सहभागी होत आहे. मिरवणुक मार्गाची पोलीस तसेच महापालिका प्रशासनाच्या वतीने पाहणी करत आवश्यक सुचना करण्यात आल्या. पोलीसांच्या वतीने मिरवणुक मार्गावर ८० हून अधिक सीसीटीव्ही क’मेरे आणि ड्रोन असतील. याशिवाय मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांच्या वतीने ही विर्सजनाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहे.

दरम्यान अखेरच्या दिवशी शुक्रवारी शहरातील भाविकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी गद केली त्यामुळे सायंकाळ नंतर शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. आता सर्वांना श्रींना निरोप देण्याचे वेध लागले आहेत. गणेशभक्त मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. अनेक मंडळांमध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा करून भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. अनेक मंडळांनी महाप्रसादाच्या जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारोवर गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

विर्सजनाच्या दिवशी निरोप देतांना २१ भाज्यांचा नैवेद्य, तळणीचे किंवा उकडीचे मोदक याचा नैवेद्य दाखवण्यासाठी सामान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत अनेकांनी गर्दी केली. दुसरीकडे, शनिवारी मुर्ती विर्सजन सोहळा पर्यावरणपुरक व्हावा या करता सामाजिक संस्था, संघटनेच्या वतीने निर्माल्य संकलन, मुर्ती संकलन सेवा देण्यात आली. या शिवाय महानगरपालिका तसेच नगरपालिकेच्या वतीने कुत्रीम तलाव तयार करत विर्सजनाची व्यस्था करण्यात आली आहे.

मनमाड नगरपालिका आणि प्रशासनातर्फे मिरवणूक मार्गावर सी.सी.टी.व्ही. आवश्यक त्या ठिकाणी प्रकाश योजना फ्लड लाईट रस्ते दुरुस्ती आदी कामे करण्यात आली आहेत. खड्डे बुजवण्यात आल्या आहेत. मिरवणुकीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे विशेष पथक अधिकाऱ्यांसह तैनात करण्यात आले आहेत. गणेश कुंडात पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय शहराच्या विविध भागात चार ते पाच ठिकाणी कृत्रिम गणेश कुंड करण्यात आले आहेत. सलग दहा दिवस घरा-घरात आणि सार्वजनिक मंडळात विराजमान झालेल्या श्रींना पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत भक्तीभावाने निरोप देण्यासाठी मनमाडकर सज्ज झाले आहेत.

श्री गणेशोत्सवाची सांगता उद्या बाप्पांना निरोप देऊन होणार आहे. जितक्या जल्लोषात उत्सव साजरा झाला. तितक्याच जल्लोषात श्रींना भक्तिभावाने निरोप देण्यासाठी मनमाडकर सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील कामाला लागले आहे. मनमाड नगरपालिकेतर्फे आवश्यक त्या सर्व सोयी आणि सुविधा ठिक -ठिकाणी करण्यात आले आहेत. कृत्रिम विसर्जन केंद्र उभारण्यात आली आहेत. क्रेनची व्यवस्था प्रकाश योजना गणेश कुंडावर सर्व सज्जता करण्यात आली आहे. मनमाड शहर पोलीस प्रशासनातर्फे शहरातून पतसंचलन करत आम्ही सज्ज असल्याचे दाखवण्यात आले आवश्यक तो कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त सर्वत्र तैनात करण्यात आला आहे.