जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदार तसेच इतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शनिवारी अजित पवार गटात प्रवेश केला. संबंधित सर्व जण आधी आमच्या संपर्कात होते. भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक होते, असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. त्यांना प्रवेश दिल्याने आम्हालाही मार्ग मोकळा झाला, असा टोला त्यांनी अजित पवार यांना हाणला आहे.
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शनिवारी अद्ययावत एमआरआय यंत्रणेचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील ,भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाले. त्याप्रसंगी मंत्री महाजन यांनी अजित पवार गटात होत असलेल्या प्रवेशाविषयी भूमिका स्पष्ट केली.
विधानसभेच्या निवडणुकीत विरोधात लढणाऱ्यांना महायुतीत घेऊ नये. घेतलेच तर चांगले तपासून घ्यावे, असे ठरले होते. त्यानंतरही अजित पवार गटात शरद पवार गटाच्या माजी मंत्र्यांना आणि इतर पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला जात आहे. वास्तविक त्यातील काहीजण आधीच भाजपमध्ये येण्यास उत्सुक होते. परंतु, शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना घेऊ नका म्हणून सांगितले होते. मंत्री पाटील यांच्या विरोधामागे काहीतरी तथ्य असेल. अजितदादा अर्थमंत्री आहेत. त्यांनी ठरविले तर ते कोणाला काही पण देऊ शकतात. त्यानुसार, पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना त्यांच्याकडून आगामी काळात मोठा निधी मिळू शकतो. परंतु, जिल्हा नियोजनचा निधी पालकमंत्रीच वितरीत करीत असतात, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.
गुलाबराव पाटील यांचीही नाराजी
दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही दोन माजी मंत्र्यांसह तीन माजी आमदारांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमची इच्छा नसतानाही अजितदादा त्यांना सर्वांना पक्षात घेत आहेत. त्यामुळे त्यांना पुढे जाऊन पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका पालकमंत्री पाटील यांनी केली. त्यांचा रोख पूर्णतः त्यांचे जळगाव ग्रामीणमधील कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर होता.