जळगाव : एकनाथ खडसेंचे राजकारणात आता काही शिल्लक राहिलेले नाही. निकाल लागल्यानंतर ठाकरे गटाची ताकद किती, काँग्रेसची किती आणि शरद पवार गटाची ताकद किती हे कळेल. खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगर परिषद निवडून दाखवावी, असे आवाहन भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिले.
जिल्ह्यात आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सध्याच्या घडीला एकनाथ खडसे यांना कोणीही ओळखत नसल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. निवडणुकांच्या तयारीच्या संदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, कोण ओळखतो त्या खडसेला? ते सध्या कोणत्या पक्षात आहेत, हेच लोकांना कळत नाही. त्यांचे अस्तित्व आज राजकारणात कुठेही दिसत नाही.
एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे सुद्धा कळत नाही. त्यांच्याविषयी बोलण्यासारखे आता फार काहीही राहिले नाही. खडसेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या सुनेला मदत केली होती. आता ते प्रत्येक निवडणुकीत स्वतःची भूमिका बदलत असतात. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचे, असे त्यांचे सध्या चालले आहे. मुक्ताईनगरमध्ये आमचे मित्र चंद्रकांत पाटील हे वेगळे लढत आहेत, असेही मंत्री महाजन म्हणाले. त्यांनी खडसे यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना अनेक गंभीर आरोप केले.
सुनेच्या दबावाखाली भाजपला मदत ?
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आमच्याकडे उमेदवार नाहीत आणि निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसाही उपलब्ध नाही, असे सांगून अचानक निवडणुकीतून माघार घेतल्याने महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. खडसेंच्या या धक्कादायक निर्णयामुळे विशेषतः काँग्रेस हादरली आहे. खडसे हे त्यांच्या सून आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दबावाखाली काम करत आहेत. तसेच त्यांनी हा निर्णय भाजपला छुपा पाठिंबा देण्यासाठी घेतल्याचा आरोप काँग्रेसचे नेते डॉ. जगदीश पाटील यांनी केला आहे. खडसेंच्या या निर्णयामुळे मुक्ताईनगरमध्ये भाजपचा मार्ग सोपा होणार असल्याचेही काँग्रेसचे म्हणणे आहे. खडसेंच्या निर्णयाची झळ मुक्ताईनगरसह इतर ठिकाणीही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. खडसेंनी काँग्रेसच्या आरोपांवर अद्याप उत्तर दिलेले नाही.
