नाशिक – भारतीय जनता पक्षात नाशिकच नव्हे, तर राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत. कुठल्याही पक्षात बाहेरचे आले की नाराजी निर्माण होत असते. पक्षात नाशिकमध्येही काही जण आले असून पक्षातंर्गत नाराजीवर काळ हाच उपाय आहे, अशी प्रतिक्रिया देत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर तसेच इतरांशी जुळवून घेण्याचे नाराज असलेल्यांना सुचित केले.
येथे सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीनंतर मंत्री महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काही जणांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी मान्य केले. असे चालुच असते. भाजपमध्ये याआधीही अनेक जण आले. आता आम्ही सर्व एकदिलाने काम करत आहोत. काळ हा यावरील उत्तर आहे. वेगवेगळ्या टप्प्यात विरोधी पक्षातील पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतील. यापुढे पाहत रहा, काय होते ते, असा सूचक इशाराच महाजन यांनी दिला. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपने शंभर पारचा दिलेला नारा महायुतीला गृहित धरून दिला आहे. महायुती म्हणूनच निवडणूक लढविणार असल्याने आम्ही शंभरपेक्षा अधिक जागा जिंकू, असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाजन हे शासकीय विश्रामगृहात आले असता नुकताच पक्षात प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर यांसह इतरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.