जळगाव – महायुतीच्या सरकारने निवडणुकीच्या आधी कृषी कर्जमाफीची घोषणा केली होती. सरकारने केलेल्या इतर चांगल्या गोष्टी सोडून एकसारखे कर्जमाफीच्या मागे लागणे योग्य नाही. शासनाकडून विकासाच्या चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. रस्ते, पूल कसे चांगले होत आहेत, त्याकडेही जरा बघा, असा अजब सल्ला भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महिला, युवक, शेतकरी ,दलित, आदिवासी आणि ओबीसी घटकांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती मंत्री महाजन यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी विशेषतः शेतकरी वर्गाला कृषी कर्जमाफीची घोषणा करून महायुतीच्या सरकारने नंतर कसे वाऱ्यावर सोडून दिले, हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महाजन काहीसे वैतागले. शेतकरी कर्जमाफीच्या विषयाला बगल देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. एवढ्या सर्व योजना असताना केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला धरून सरकारला कोंडीत पकडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, जळगाव शहरातील अनेक रस्ते तीन वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहेत. पावसाळा सुरू झाला तरी संबंधित कंत्राटदारांनी रस्त्यांचे काम पूर्ण केलेले नाही, याकडे लक्ष वेधले असता पुढील चार महिन्यात सर्व रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.
केंद्र सरकारची गेली ११ वर्षे सेवा, सुशासन व गरीब कल्याणाला समर्पित आहेत. आत्मनिर्भर ते विकसित भारत, या संकल्पाद्वारे करण्यात आलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्णाक्षरात केली जावी, अशी आहे. भ्रष्टाचार, घोटाळ्यांची जागा आता जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावरून लवकरच चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे. डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, संरक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता वाढविण्यात केंद्र सरकार अग्रेसर राहिल्याचा दावाही मंत्री महाजन यांनी याप्रसंगी केला. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.