नाशिक : महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून बराच सुप्त संघर्ष झाला. सुरुवातीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव जाहीर झाले होते. परंतु, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) विरोधामुळे त्यास स्थगिती द्यावी लागली. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा सांगितला जातो. या त्रांगड्यामुळे पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडलेली आहे. मित्रपक्षांच्या विरोधामुळे औट घटकेचे पालकमंत्री ठरलेल्या महाजन यांनाही आता पालकमंत्री करा अथवा करू नका… हे सांगण्याची वेळ आली आहे.
आगामी कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदास महत्व प्राप्त झाले आहे. हिंदू धर्मियांच्या सर्वात मोठ्या उत्सवात आपला प्रभाव राखण्याचा सत्ताधारी पक्षांचा प्रयत्न आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्षांनी हा प्रतिष्ठेचा विषय केला. त्यासाठी भाजपचे गिरीश महाजन, राष्ट्रवादीचे (अजित पवार) छगन भुजबळ व ॲड. माणिक कोकाटे, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) दादा भुसे हे इच्छुक होते. बरीच रस्सीखेच होऊनही तोडगा निघाला नाही. महायुतीतील मतभेद कायम असताना अखेर पालकमंत्रीपदाच्या स्पर्धेतील चार मंत्र्यांना कुंभमेळा मंत्री समितीत स्थान देण्यात आले. अर्थात या समितीचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे प्रमुख आहेत. पालक मंत्रीपदाच्या तिढ्यात प्राधिकरणाचे कामकाज या समितीच्या सल्ल्याने करण्याचा तोडगा काढला गेल्याचे मानले जाते.
कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो कोटींची विकास कामे होणार आहेत. कुंभमेळ्याचे उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कुंभमेळा मंत्री समिती स्थापन करण्यात आली. हिंदू धर्मियांच्या सर्वात मोठ्या उत्सवात आपला प्रभाव राखण्यासाठी महायुतीतील तिन्ही पक्ष उत्सुक आहेत. यातून पालकमंत्री पदासाठी तीव्र स्पर्धा झाली. गतवेळी कुंभमेळा व पालकमंत्री अशी एकत्रित जबाबदारी गिरीश महाजन यांनी सांभाळली होती.
यावेळीही भाजपने त्यांच्यावर तशीच जबाबदारी सोपविली. मात्र, मित्रपक्षांच्या विरोधामुळे एक पाऊल मागे घ्यावे लागले. भाजप देखील मित्रपक्षांना पालकमंत्रीपद देण्यास तयार नसल्याने नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न मार्गी लागणे धुसर बनले आहे. रविवारी नाशिक दौऱ्यात एका प्रश्नावर मिस्कीलपणे उत्तर देताना मंत्री गिरीश महाजन यांनी देवाकडे माझे काही मागणे नसल्याचे सांगितले. पालकमंत्री करा, किंवा नका करू. आता मी कुंभमेळामंत्री आहे. चांगले काम चालले आहे. देवाने जे दिले, त्यात सुखी रहावे. देवाकडे फार जास्त मागणी करू नये, या मताचा मी असल्याचे महाजन यांनी नमूद केले.