जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारात सोने, चांदीच्या दराने उच्चांक गाठल्याने ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या दरवाढीमुळे सुवर्ण बाजारातील व्यवहाराव काही प्रमाणात परिणाम झाला असून ग्राहकांच्या खर्चाचे गणित बिघडल्याने त्याचा काहीअंशी परिणाम थेट खरेदीवर झाला आहे. व्यापाऱ्यांनाही त्याची झळ सहन करावी लागत आहे.सुमारे १६० वर्षांची परंपरा असलेला जळगावचा सुवर्ण बाजार शुद्ध सोन्यासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध असून, सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील विश्‍वासार्हता यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक जळगावात येतात.

आजही याठिकाणी तब्बल १५० सुवर्ण पेढ्या सोने खरेदी-विक्रीच्या व्यवसायात कार्यरत आहेत. अलिकडच्या काळात सोने व चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर विशेषत्वाने जळगावच्या सुवर्ण बाजाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्षभरात सोन्याचे दर सुमारे २२ हजार रुपयांनी वधारून प्रति तोळा ९१ हजारापुढे, तर चांदीचे दर २६ हजार रुपयांनी वधारून प्रति किलो एक लाखापुढे गेले आहेत.

दोन्ही मौल्यवान धातुंच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असताना, ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडत चालले आहे. हाताशी असलेल्या जमापुंजीमधून कमी वजनाचे सोने त्यांना खरेदी करावे लागत आहे. बाजारातील एकूण आर्थिक उलाढाल तेवढीच असली, तरी दागिन्यांचा खप कमी झाल्याने व्यापाऱ्यांच्या नफ्यातही त्यामुळे मोठी घट झाली आहे.

सोने मोडण्याचे प्रमाण नगण्य

उच्चांकी दरवाढीनंतर सुवर्ण बाजारात यापूर्वी स्वस्तात खरेदी केलेल्या सोन्याची मोड करून त्यापासून पैसे बनवणाऱ्यांची संख्या वाढणे अपेक्षित होते. परंतु, वर्षभरातील मोठी दरवाढ लक्षात घेता यापुढेही सोन्याचे दर वाढत राहतील, या आशेवर बहुतेकांनी सोने मोडण्याचा मोह सध्यातरी टाळला आहे. त्यामुळे सोने मोडणाऱ्यांचे प्रमाण नगण्यच आहे.

सोने, चांदी दरात अचानक वाढ झाल्याने काही अंशी खरेदीवर परिणाम नक्की झाला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांचे गणित बिघडते. कारण त्यांचे गणित पैशांवर अवलंबून असते, वजनावर नाही. सुशिलकुमार बाफना (संचालक, रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स, जळगाव)

संसाराचा गाडा हाकताना बचत केलेल्या पैशांवर सोने खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले होते. परंतु, अचानक वाढलेले दर लक्षात घेता ठरवले होते त्यापेक्षा खूपच कमी सोने खरेदी करता आले. सुरेखा चौधरी (गृहिणी, जळगाव)