जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारच्या तुलनेत सोमवारी सोन्याच्या दरात प्रति तोळा ५१५ रूपये आणि चांदीच्या दरात प्रति किलो १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. श्रावण महिना आणि सण-उत्सवांची चाहुल लागल्याने ग्राहकांकडून वाढत चाललेली मागणी, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि औद्योगिक वापर, ही काही कारणे दोन्ही धातुंच्या किंमतीत वाढ होण्यामागे असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात आले.
जळगावमध्ये शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख एक हजार ४५५ रूपयांपर्यंत होते. सोमवारी दिवसभरात ५१५ रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख एक हजार ९७० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. याशिवाय, शनिवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १६ हजार ३९० रूपयांपर्यंत होते. सोमवारी दिवसभरात १०३० वाढ नोंदविण्यात आल्यानंतर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १७ हजार ४२० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. दोन्ही धातुंच्या दरातील तेजी कायम राहिली.
लग्नसराई संपल्यानंतर काही काळासाठी जळगावच्या सुवर्ण बाजारात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी मंदावली होती. शेतकरी आणि शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त असल्याने बाजारपेठेत खरेदीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले होते. मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर कमी होऊन काही काळासाठी एक लाखाच्या खाली आले होते. मात्र, धार्मिक व पारंपरिक महत्त्व असलेल्या श्रावण महिन्यासह आगामी रक्षाबंधन, गौरी-गणपती आणि इतर सणांमुळे सोन्याच्या खरेदीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये नवचैतन्य पसरले आहे. दागिन्यांच्या डिझाइन्समध्येही सध्या वैविध्य पाहायला मिळत असून, ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन सराफ व्यावसायिक नव्या ट्रेंडनुसार दागिन्यांची श्रृंखला सादर करताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या दरात आणि खरेदीत वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
एकूणच, सणासुदीचा काळ जवळ येत असल्यामुळे सोन्याच्या बाजारात पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक पातळीवर निर्माण झालेली आर्थिक अनिश्चितता देखील सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत ठरत आहे. अनेक गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्यासाठी पारंपरिक आणि सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे वळणे पसंत केले आहे. सुरक्षिततेचा पर्याय म्हणून मागणी वाढल्याने जागतिक बाजारातही सोन्याचे दर स्थिर राहण्याऐवजी हळूहळू वाढू लागले आहेत. ही स्थिती आगामी काळात कायम राहण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.