लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शहरातील सराफ बाजारात शुक्रवारी चांदीचा भाव एक लाख एक हजार ९७० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी शनिवारी किलोमागे दोन हजार ८०० रुपयांची घट नोंदवण्यात आल्याने चांदी ९९ हजार ८६ रुपयांपर्यंत खाली आली. उच्चांकी भावाकडे वाटचाल करणाऱ्या चांदीचा तोरा उतरल्याने ग्राहकांनाही दिलासा मिळाला.

जळगावमध्ये गुरूवारी चांदीचे भाव जीएसटीसह ९९ हजार ९१० रुपये प्रतिकिलो होते, त्यात शुक्रवारी किलोमागे दोन हजाराची वाढ नोंदवण्यात आल्यानंतर चांदी एक लाख एक हजार ९७० रुपयांपर्यंत पोहोचली होती. दिवाळीला उच्चांकी एक लाख चार हजार रुपये प्रति किलोपर्यंत गेलेले चांदीचे भाव चार महिन्यांपासून एक लाखाच्या आतच होते. त्यामुळे शुक्रवारी अचानक चांदीने मोठी उसळी घेतल्यानंतर ग्राहकांना धक्का बसला होता. मात्र, शनिवारी दोन हजार ८०० रुपयांची घट झाल्याने चांदीचा भाव उतरला.

काही दिवसांपासून चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. जागतिक बाजाराची स्थिती, रुपयाच्या मूल्यातील घसरण आणि अन्य आर्थिक घटकांचा परिणाम स्थानिक बाजारावरही होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुढील काही दिवसांमध्ये चांदीच्या किंमतीत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता असल्याने व्यापारी आणि गुंतवणूकदार त्यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोन्यातही १३०० रुपयांची घट

जळगावमध्ये गुरूवारी सोन्याचा भाव जीएसटीसह ८८ हजार ७८६ रुपये तोळा होता, त्यात शुक्रवारी ३०९ रुपयांची वाढ नोंदवण्यात आल्यानंतर सोने ८९ हजार ९५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. परंतु, शनिवारी प्रतितोळा तब्बल १३०० रुपयांची घट झाल्यामुळे सोने ८७ हजार ७५६ रुपयांपर्यंत खाली आले.