जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत ट्रम्प टॅरिफच्या प्रभावामुळे सोने आणि चांदीच्या किमती दररोज नवीन उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहेत. शुक्रवारी देखील दोन्ही धातुंनी दरात मोठी वाढ नोंदवली गेल्याने पुन्हा नवा उच्चांक केला.
सध्या सोन्याच्या किमतीने घेतलेली मोठी उसळी ही अमेरिकेतील व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे आहे. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदरात ०.२५ टक्क्यांची कपात करू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कामगार बाजारातून येणारे कमकुवत संकेत या निर्णयाला आधार देत आहेत. ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीचा दर वाढून ४.३ टक्क्यांवर पोहोचला, तर नोकऱ्यांमध्ये वाढ फक्त २२,००० इतकी मर्यादित राहिली. याच्या आधी जुलै २०२५ मध्ये नोकरी वाढीचा आकडा ७९,००० इतका होता. या परिस्थितीमुळे फेड दरकपातीचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक मजबूत झाली आहे.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली. कॉमेक्सवर सोने ०.४७ टक्क्यांनी म्हणजेच १७.४० डॉलर्सने वाढून ३,६९१ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले. त्याचवेळी, स्पॉट गोल्डचा दर ०.४८ टक्क्यांनी म्हणजेच १७.४५ डॉलर्सने वाढून ३,६५१.५२ डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करताना दिसला. याशिवाय, शुक्रवारी सकाळी चांदीच्या दराने देखील जोरदार उसळी घेतली. देशांतर्गत वायदा बाजारात या मौल्यवान धातूचा व्यवहार वाढीच्या चिन्हावर सुरू झाला. एमसीएक्स एक्सचेंजवर सुरुवातीच्या सत्रात चांदीचा वायदा भाव वाढून एक लाख २९ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला. चांदीच्या किमतीसाठी हा नवीन उच्चांक ठरला आहे.
जळगावमध्ये गुरूवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १३ हजार १९७ रूपयांपर्यंत होते. शुकवारी बाजार उघडताच ६१८ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १३ हजार ८१५ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले. सोने सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्याचे लक्षात घेता ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. लग्न सोहळे तसेच सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चांदीत दीड हजाराने वाढ
जळगावमध्ये गुरूवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३१ हजार ३२५ रूपयांपर्यंत होते. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बाजार उघडताच सुमारे १५४५ रूपयांची घसघशीत वाढ नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३२ हजार ८७० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.