जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात नाकाबंदीत मोटारीची तपासणी करताना सुमारे २० लाख रुपयांच्या २८० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वस्तू मिळून आल्या. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. याअनुषंगाने जिल्हा पोलीस दलातर्फे जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी तसेच राज्याच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली. याअनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस ठाण्यांतर्गत शहरातील परिवर्तन चौकात पोलीस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते, सहायक निरीक्षक संदीप धुमगहू, हवालदार छोटू वैद्य, पोलीस नाईक प्रशांत चौधरी, प्रवीण जाधव, अभिमान पाटील यांचे पथक नाकाबंदीसाठी तैनात होते. तेथे पथकाला संशयास्पदरीत्या पांढर्‍या रंगाची मोटार दिसून आली. त्यांनी ती मोटार थांबवत तपासणी केली.

हेही वाचा…मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी समाजमाध्यम प्रभावकांची मदत का घेतली जात आहे ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पथकाला मोटारीतून सुमारे २० लाख रुपये किमतीच्या २८० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वस्तू मिळून आल्या. मोटारचालक भवरलाल जैन (रा. जळगाव) याला सोन्याच्या वस्तूंच्या पावत्या, परवान्याबाबत पोलिसांनी विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलिसांचा संशय बळावल्याने कारवाई करुन सोन्याच्या वस्तू जप्त केल्या. याप्रकरणी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

हेही वाचा…निवडणूक आयोगाच्या ॲपला नागरिकांचा प्रतिसाद

दरम्यान, मोटारीतून सोन्याच्या वस्तू मुक्ताईनगरमार्गे बर्‍हाणपूरकडे नेत असताना मोटार चालकाकडे त्यासंदर्भात कुठलीही कागदपत्रे, परवाना, पावत्या नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक मोहिते यांनी सांगितले. या कारवाईने सराफी व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.