नाशिक – नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील शासकीय विद्यानिकेतन अर्थात गव्हर्नमेंट पब्लिक स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांना सध्या पुण्याचे वेध लागले आहे. अर्थात, त्यासाठी कारणही तसेच आहे. “शाळेच्या गप्पा-आठवणींची मस्ती, पुण्यात पुन्हा तीच दोस्ती!” हे भावनिक घोषवाक्य या माजी विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहे. त्यासाठी हे सर्व माजी विद्यार्थी पुण्याला जाणार आहेत.

पुण्यात १४, १५ आणि १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बंटारा भवन, बाणेर रोड येथे शासकीय विद्यानिकेतन अर्थात गव्हर्नमेंट पब्लिक स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांचा “महामेळावा २०२५” होणार आहे. या महाजागरात सुमारे दोन हजार माजी विद्यार्थी उपस्थित राहून एक विक्रम करणार आहेत. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून ५०० माजी विद्यार्थी या महोत्सवात हजेरी लावणार आहेत.

१९६६ साली स्थापन झालेल्या शासकीय विद्यानिकेतनांच्या कोयनानगर, सातारा, पुसेगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, चिखलदरा, अमरावती, यवतमाळ, केळापूर या पाच ठिकाणी शाळा सुरु आहेत. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून या शाळा सुरु करण्यात आल्या. या पाच शाळेचे शेकडो माजी विद्यार्थी एकत्र येऊन, जुन्या आठवणींना उजाळा देत समाजोपयोगी कार्याचे नवीन मार्ग ठरवणार आहेत.

१४ नोव्हेंबर हा ओळख आणि स्वागताचा दिवस राहणार असून पहिल्या दिवशी आगमनानंतर स्वागत समारंभ, ओळखपरेड सत्र, गप्पा होणार आहेत. रात्री विद्यानिकेतन गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रमाने मेळाव्याची रंगत वाढवली जाईल. १५ नोव्हेंबर रोजी अनुभव, विचार आणि प्रेरणा या धर्तीवर सकाळी पीटी सत्राने दिवसाची सुरुवात होईल.यानंतर “गॅलॅक्सी ऑफ जीपीएस:विद्यानिकेतनचे दिवंगत तारे” या भावपूर्ण श्रद्धांजली सत्रासोबत विद्यार्थी परिषदा, गिव्ह बॅक फाउंडेशनचे कार्य, साहित्यिक आणि सामाजिक कार्याचे अनुभव वाटप आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. दुपारी ‘विद्यानिकेतनचे ऋण फेडण्याचा संकल्प’ आणि ‘विद्यानिकेतनच्या लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन’ हा प्रेरणादायी उपक्रम होईल.

रात्री “टर्निंग पॉइंट्स इन लाईफ ” या विषयावर विचारमंथन सत्र होणार आहे. १६ नोव्हेंबर हा करिअर आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शनाचा दिवस असणार आहे. यादिवशी तरुण, होतकरू माजी, आजी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, यशोगाथा,फोटो व सेल्फी सत्र, स्मृतिचिन्ह वितरण असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सर्व कार्यक्रमांनंतर मेळाव्याचा समारोप दुपारी होईल. माजी विद्यार्थ्यांमध्ये या महामेळाव्याबाबत प्रचंड उत्सुकता असून, जगभरातील दोन हजारपेक्षा जास्त माजी विद्यार्थी पुण्यात भेटणार आहेत. महामेळाव्याची जय्यत तय्यारी सुरु असून आयोजन समिती आठ महिन्यांपासून अविश्रांत परिश्रम घेत आहेत.