नाशिक : पीएमश्री निधीतून बदापूर येथील जिल्हा परिषद शाळेत चाललेल्या कामात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अडथळा न आणण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील बदापूर गट (ग्रुप) ग्रामपंचायतीचा सदस्य रामनाथ देवडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्याच्याविरुध्द येवला शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बदापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय समिती अध्यक्षांनी तक्रार दिली होती. या शाळेला पीएमश्रीतून सात लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शाळेत सुशोभिकरण, परसबागेचे काम प्रगतीपथावर आहे. या कामात ग्रामपंचायतीमार्फत अडथळे न आणण्याच्या मोबदल्यात सदस्य रामनाथ देवडे (५२, चिंचोडी खुर्द, बदापूर ग्रुप ग्रामपंचायत) याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून १५ हजार रुपये स्वीकारत असताना संशयित देवडेला रंगेहात पकडण्यात आले. संशयित देवडेविरुध्द येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…नाशिक : ‘आप’चे मनपासमोर बोंबाबोंब आंदोलन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नाना सूर्यवंशी यांनी जबाबदारी सांभाळली. पथकात हवालदार सचिन गोसावी, पोलीस नाईक अविनाश पवार यांचा समावेश होता.