मालेगाव : भरधाव जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसची राष्ट्रीय महामार्गावरील मुंगसे शिवारात दुचाकीला धडक बसल्याने आजोबा आणि नात यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरी नात गंभीर जखमी आहे. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने अडीच तासापेक्षा अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली.

मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. मुंगसे शिवारातील शेतमळ्यात वास्तव्यास असलेले सीताराम सूर्यवंशी (६५) हे मंजुषा (१५) आणि वैष्णवी (१३) या नातींना दुचाकीने शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. मुंगसे गावाजवळ आल्यावर महामार्गाच्या कडेला सूर्यवंशी यांनी दुचाकी उभी केली. त्याचवेळी शिरपूर आगाराच्या नांदुरी-शिरपूर या चुकीच्या बाजूने आणि भरधाव जाणाऱ्या बसने दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर या बसने काही अंतर वाहनासह तिघांना फरफटत नेले. या अपघातात सूर्यवंशी आणि त्यांची लहान नात वैष्णवी यांचा जागीच मृत्यू झाला. मंजुषा ही गंभीर जखमी आहे. जखमी मंजुषाला गावकऱ्यांनी तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा – धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात

अपघाताचे वृत्त समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुंगसे गावाजवळ वारंवार अपघात घडत असतात. आतापर्यंत अनेकांचा बळी गेला आहे, मात्र प्रशासनातर्फे त्यासंदर्भात काहीच उपायोजना केल्या जात नाहीत, अशी तक्रार करत संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या दिला. अपघाताच्या वारंवार घडणाऱ्या घटना लक्षात घेता या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. अपघातानंतर आंदोलन सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी नितीन सदगीर, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांची समजूत काढली. अडीच तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा – धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित

मुंगसे गावाजवळ आतापर्यंत पाच ते सहा अपघात झाले आहेत. त्यात काहींचा बळी गेला आहे. मात्र प्रशासन याविषयी कमालीची बेपर्वाई दाखवत आहे. दुर्घटना घडल्यानंतर प्रत्येक वेळी ग्रामस्थ आंदोलन करतात. गावाजवळ स्थानिकांना वाहतुकीच्या सोयीसाठी महामार्गाखाली एक बोगदा निर्माण केला तरी अपघाताच्या अशा घटना टाळता येतील. – सुनील सूर्यवंशी (स्थानिक ग्रामस्थ, मुंगसे)