लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: महिनाभरानंतर दाखल झालेला पाऊस जोर धरत असताना शुक्रवारी पहाटे दिंडोरी तालुक्यात जुने घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आजोबा व नातू यांचा दुदैवी मृत्यू झाला. ढिगाऱ्ऱ्याखाली अडकलेल्या आजीला सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागात संततधार सुरू आहे.
दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या नाशिक जिल्ह्यात महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाले. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी त्याचे स्वरुप रिमझिमच्या पलिकडे गेले नव्हते. रात्रीपासून मात्र त्याने चांगलाच जोर पकडला. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दिंडोरी तालुक्यात त्याचा जोर तुलनेत अधिक आहे.
हेही वाचा… कावळेही आता व्यसनाधीन!
पावसामुळे पहाटे नळवाडपाडा येथे जुने घर कोसळले. या दुर्घटनेत गुलाब वामन खरे (आजोबा) आणि निशांत विशाल खरे (नातू) या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणेने धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विठाबाई गुलाब खरे (आजी) यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
हेही वाचा… मराठा समाजातर्फे मालेगावात रास्ता रोको
दरम्यान, ऑगस्ट महिना पूर्णत: कोरडा गेल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. सप्टेंबरच्या पूर्वार्धात जिल्ह्यात सर्वसाधारपणे ७९३ मिलीमिटर पावसाची नोंद होते. यंदा आतापर्यंत केवळ ४२१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ९४७ मिलीमीटर इतके होते. सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत यंदा केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे.
पावसाअभावी अनेक भागातील पिके हातची निघून गेली. पावसात इतका खंड पडला की, दुबार पेरणी अशक्य बनली. कृषी उत्पादनात मोठी घट येणार असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. ऐन पावसाळ्यात शेकडो गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणी द्यावे लागत आहे. या एकंदर परिस्थितीत पावसाने जोर पकडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा पल्लवीत झाली आहे.