जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात रिंगणगाव येथे सोमवारपासून बेपत्ता असलेल्या १४ वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या झाल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
रिंगणगाव येथे गजानन महाजन यांचे हार्डवेअर साहित्य विक्रीचे दुकान आहे. सोमवारी बाजाराचा दिवस असल्याने जळगावी कामानिमित्त जावे लागणार असल्याने त्यांनी आपला मुलगा राजेश यास दुकानात थांबण्यास सांगितले होते. राजेश दुपारपर्यंत दुकानावर थांबून नंतर घरी जाणे अपेक्षित होते. मात्र, तो दुकान बंद केल्यानंतर घरी पोहोचलाच नाही. त्यामुळे त्याची सगळीकडे शोधाशोध सुरू झाली.
सायंकाळी एरंडोल पोलीस ठाण्यातही राजेश हरविल्याची नोंद करण्यात आली. पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड यांनी तपासाला वेग दिल्यानंतर मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावालगतच्या शेतात गळा चिरलेल्या अवस्थेत एका मुलाचा मृतदेह आढळून आला. महाजन कुटुंबियांना बरोबर घेऊन पोलीस घटनास्थळी गेले असता मृतदेह राजेश याचा असल्याची खात्री पटली. घटनास्थळी न्यायवैद्यक पथक दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता नेरकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. राजेश हा इयत्ता आठवीत शिकत होता. त्याची अशी निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, मुलाच्या हत्येत त्यांचा सहभाग आहे किंवा नाही, त्यादृष्टीने त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.