नाशिक – कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा भाऊ सचिन याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याची माहिती पुढे आली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडले. अशा मंत्र्याला तात्काळ बडतर्फ केले पाहिजे. परंतु, भ्रष्ट माणसाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे विचित्र कार्यपद्धतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याला लाभले असून कोणी काहीही करा, त्याला बढती मिळेल, असे त्यांचे धोरण असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्यावतीने गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालयात करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हानिहाय बैठका पार पडत आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे एकेक कदम उघडे होत असल्याचे नमूद केले. मंत्रिमंडळात बेताल व बेजबाबदार सदस्य आहेत. महाराष्ट्राला हे शोभनीय नाही. पुण्यातील स्वारगेट घटनेवेळी कदम यांनी वादग्रस्त विधाने केली.

गृहराज्यमंत्री एक नमुना आहे. त्यांच्या आईच्या नावावर डान्सबार चालतो, पोलिसांकडून छापा टाकल्यावर २२ तरुणींना पकडले जाते. कारवाईने लक्तरे बाहेर येतात. आता त्यांचे हात थेट बंदुकीचा परवाना देण्यापर्यंत पोहोचले आहेत. अशा व्यक्तीला मंत्रिमंडळातून त्वरित बाहेर काढले पाहिजे, परंतु, तसे घडत नसल्याकडे लक्ष वेधथ सपकाळ यांनी माजी कृषिमंत्री व विद्यमान क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांचा दाखला दिला.

प्रत्येक भ्रष्ट माणसाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे, विचित्र कार्यपद्धतीचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. कोणी काहीही केले, कसेही वागले तरी त्याला बढती दिली जाते. माजी कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त विधाने केली होती. परंतु, त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याऐवजी प्रोत्साहन दिले गेले. रमी खेळाच्या विपणनासाठी क्रीडामंत्री करण्यात आले. याच धर्तीवर कदम यांंनाही आता लवकरच बढती दिली जाईल, असा टोला त्यांनी हाणला. अशा विचित्र वागणाऱ्या सर्वांचा आका दुसरे, तिसरे कोणी नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, ते त्यांचे पाठिराखे आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला. त्यामुळे केवळ मंत्रीच नव्हे तर, सत्ताधारी आमदारही विचित्र पद्धतीने वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.