नाशिक – सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने वस्तू (चप्पल किंवा कागदाचा गुंडाळा) फेकण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्याचा निषेध करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हल्लेखोर वकिलाचे नाव जाणीवपूर्वक दडवले जात असल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील काँग्रेसचे कार्यकर्ते मामा पगारे यांच्यांबाबत असाच घृणास्पद प्रकार घडला होता. त्याचे पुढील पाऊल सर्वोच्च न्यायालयात पहायला मिळाल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसच्यावतीने गुरुवारी उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन नाशिकरोड येथील उत्सव मंगल कार्यालयात करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हानिहाय बैठका होत आहेत. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी भाष्य केले. काँग्रेसचे डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते मामा पगारे यांच्याबाबतीत घडलेल्या घृणास्पद प्रकाराचे पुढील पाऊल म्हणजे न्यायालयात घडलेली घटना असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.
सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस व्यापक स्वरुपात आंदोलनातून निषेध करीत आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला करणारा कोण शर्मा की तिवारी होता, ते जाहीर करावे. संबंधित वकिलाचे आडनाव जाणूनबुजून लपवले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, तेव्हा त्यांच्यावर खानाबरोबर असलेल्या एकाने हल्ला केला होता. संबंधिताचे नाव जसे लपवून ठेवले गेले, तसेच सर्वोच्च न्यायालयातील घटनेत दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सरन्यायाधीश गवई यांच्यावरील हल्ला हा थेट लोकशाहीवरील हल्ला आहे. मनुवादी विचारसरणीचे उद्दात्तीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले. काही दिवसांपूर्वी असेच विकृत कृत्य डोंबिवली परिसरातील काँग्रेसचे मामा पगारे यांच्याबाबत घडले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी समाज माध्यमात संदेश टाकला. तेव्हा टोळक्याने त्यांना दवाखान्यातून बाहेर ओढत नेले. जातीवाचक शिवीगाळ करत घृणास्पद प्रकार केला होता. त्याच प्रकारे पुढील पाऊल सर्वोच्च न्यायालयात पहायला मिळाल्याचे सपकाळ यांनी सांगितले. यावर नागरिकांनी वेळीच पावले उचलायला हवीत. अन्यथा सर्वत्र घराघरात अशा घटना घडतील. सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली.