नाशिक – साखर कारखान्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कापणी यंत्र (हार्वेस्टर) योजनेची आखणी करीत आहे. जेणेकरून ऊस तोडणी मजुरीवरील खर्च कमी होऊन कारखान्यांना बळकटी मिळेल, असा दावा कृषिमंत्री माणिक कोकाटे यांनी केला आहे. बनावट खते, कीटकनाशकांना चाप लावण्यासाठी कृषी विभाग नमुन्यांचे जलद विश्लेषण करणारे दोन कोटी रुपयांचे यंत्र खरेदी करीत आहे. त्याद्वारे संबंधित उत्पादन बनावट आहे की नाही, याची जागेवरच पडताळणी होईल, अशी माहितीही कोकाटे यांनी दिली.

रविवारी येथील उंटवाडीत कृषिमंत्र्यांच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ॲड. कोकाटे यांच्या हस्ते झाले. अडचणीत सापडलेल्या राज्यातील २०० हून अधिक साखर कारखान्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. कारखाने सध्या तोट्यात असल्याने त्यांची मागणी रास्त असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. साखर कारखान्यांच्या मदतीसाठी कृषी विभाग कापणी यंत्राची योजना आणत आहे. यामुळे त्यांच्या ऊस तोडणीवरील खर्चात बचत होईल, असे त्यांनी सूचित केले.

बनावट औषधे, खते, कीटकनाशकांच्या नमुन्यांचे जलद विश्लेषण करू शकणाऱ्या यंत्राचे प्रात्यक्षिक झाले आहे. यामध्ये नमुने टाकल्यानंतर उत्पादनाची सत्यता, गुणधर्म समजून घेण्यास मदत होईल. जेणेकरून उत्पादनाचा वापर, विक्री व वितरण याबाबत योग्य पावले उचलता येतील, असे कोकाटे यांनी सांगितले. विविध विकास प्रकल्पांमुळे शेतजमिनींमध्ये घट होत असल्याचे त्यांनी मान्य केले. प्रकल्प हवेत होऊ शकत नाहीत. जेवढी प्रगती कराल, तेवढ्या जमिनी उपलब्ध कराव्या लागतील, असे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. प्रत्येक पक्ष आपल्यापरीने प्रयत्न करतो. आमच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी कोणाचे काढून घ्यायचे, असा विचार आमच्या मनात नाही. राज्यातील जनतेने दादांच्या पाठिशी उभे राहावे, असेही आम्हांला वाटत असल्याचे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले.