जळगाव – शहरासह जिल्ह्यात पाच-सहा दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील रावेरसह तालुक्याला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात रोझोदा येथील तरुण बेपत्ता झाला असून, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाकडून त्याचा शोध घेतला जात आहे, तर अहिरवाडी गावातून ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. रावेर, यावल, बोदवड, भुसावळ या तालुक्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे.

हेही वाचा >>> धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा निम्म्याहून कमी जलसाठा; जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ६२ टक्के पाऊस

तालुक्यातील मात्राण, नागझिरी, सुकी आदी नद्या-नाल्यांना पूर आला आहे. घरांची पडझड झाली आहे. पाल-खिरोदा, कुसुंबा-लोहारा, उटखेडा-कुंभारखेडा येथील पूल पाण्याखाली गेले आहेत. रावेर शहरातील नागझिरी नदीला पूर आल्याने जुना सावदा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  गारबर्डी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सुकी नदीला पूर आला आहे. रोझोदा येथील रवींद्र चौधरी ऊर्फ महेंद्र कोळी हा गारबर्डी धरण परिसरातील सुकी नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळी पोहायला गेला होता.

हेही वाचा >>> पावसाने सरासरी न गाठल्यास पुढील वर्षाचे नियोजन गरजेचे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोहत असताना अचानक तो  बेपत्ता झाला. त्याचा शोध राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाकडून घेतला जात आहे. रावेर तालुक्यातील अहिरवाडीतील नागमोडी नदीला मोठा पूर आला आहे. गावात पाणी शिरले असून, पाच कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलविले आहे. यावल, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ या शहरांसह तालुक्यातही दिवसभर संततधार सुरू होती. यावल तालुक्यातील पूर्वेकडील भागात अधिक पाऊस झाला, तर पश्चिम भागात कमी पाऊस झाला.