नाशिक – जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही धरणांच्या विसर्गात मोठी वाढ झाल्यामुळे दारणा, कादवा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरात १० तासांत ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. बागलाण तालुक्यात घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. एक महिला जखमी झाली. मालेगाव तालुक्यात १६ वर्षीय तरुण मेंढपाळासह त्याच्या मेंढ्यांवर वीज पडली. यामध्ये १० मेंढ्या मयत झाल्या असून मेंढपाळ गंभीर जखमी झाला.
शनिवारी सायंकाळपासून अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी सकाळपर्यंत त्याचा जोर कायम होता. १८ धरणांमधून विसर्ग करावा लागला. दारणा, पालखेड, कडवा व नांदूरमध्यमेश्वर धरणांच्या विसर्गात मोठी वाढ करण्यात आली. कादवा व दारणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक शहरात रात्री अवघ्या तीन तासांत ३१.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. गंगापूरमधील विसर्ग आणि शहरातील पाऊस यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात आहे.
मालेगाव तालुक्यातील मळगाव येथे समाधान वाकळे (१६) मेंढ्या चारण्यासाठी गेला होता. यावेळी वीज कोसळून तो गंभीर जखमी झाला. त्याला मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत १० मेंढ्या मयत झाल्या. बागलाण तालुक्यात मुसळधार पावसात गाराणे गावात एका घराची भिंत कोसळली. यामध्यटे वृद्धेचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली. अनेक भागात घरांची पडझड झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनिल वाघेरे यांची म्हैस वीज पडून गतप्राण झाली.
नांदगावसह अनेक भागात दोन ते तीन तास मुसळधार पाऊस कोसळला. नांदगावातील न्यू इंग्लिश स्कूल, गंगाधरी बायपास, रेल्वे गेट परिसर, हुतात्मा चौक, शनी मंदिर पूल आदी ठिकाणी पावसामुळे पाणी साचले. रेल्वे स्थानक परिसरात झाड उन्मळून पडले. रेल्वे फाटक बंद करून उभारण्यात आलेल्या उपमार्गात गुडघाभर पाणी साचले. या पाण्यातून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागली. ग्रामीण भागातही पावसाचा मोठा फटका बसला..काढणीला आलेल्या मका, कपाशी व नव्याने लागवड केलेल्या कांद्यासह कांदा रोप व इतर पिकांचे देखील नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
विसर्गात वाढ
रविवारी सकाळी जिल्ह्यातील १८ धरणांमधून विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. दारणा १२ हजार १६७, पालखेड १२ हजार १२४ आणि कडवा धरणाचा विसर्ग ६७५२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ४८८६, वालदेवी ८१४, आळंदी २४३, भावली २९०, भाम ५१०, वाघाड ९३०, ना्ंदूरमध्यमेश्वर ३१२८३, करंजवण ६६७५, तिसगाव ७८, गौतमी गोदावरी १२९६, कश्यपी ४८०, ओझरखेड ७०० आणि पुणेगाव धरणातून १९२० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे.