जळगाव – जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. पैकी जामनेर तालुक्यात सर्वाधिक ७२.३ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. वाघूरसह इतर बऱ्याच नद्यांना पूर आल्याने बहुतेक रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. काठावरील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संबंधितांचे मोठे नुकसान झाले.
जामनेर तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या संततधार पावसाने तालुक्यातील अनेक गावांत भीषण परिस्थिती निर्माण केली. नेरी, चिंचखेडे, सुनसगाव यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नाल्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले.
परिणामी जळगाव-जामनेर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. रात्रीपासून शेकडो वाहनचालक व प्रवासी रस्त्यावरच अडकून पडले. इतरही बरेच रस्ते ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील मार्ग बंद झाले. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये व उभ्या पिकांमध्ये शिरले. परिणामी, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी जनावरेही वाहून गेल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी सकाळी थोडेफार पाणी ओसरल्यानंतर वाहतूक काहीअंशी सुरळीत झाली.
दरम्यान, पावसाचा जोर थोडा कमी झाल्यानंतर महसूल प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामाला गती दिली. तहसील विभाग व आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी दाखल झाल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना वेग आला. वाघूरसह इतर बऱ्याच नद्या अजुनही दुथडी भरून वाहत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना नद्या व नाल्याच्या काठावर जाण्याचे टाळून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनीही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडून अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांवर भर देण्याच्या दृष्टीने निर्देश दिले. जामनेर तालुक्यातील अनेक शाळांना अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने सदरचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
कुठे किती पाऊस झाला ?
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात जामनेर तालुक्यात सरासरी ७२.३ मिलीमीटर आणि पाचोरा तालुक्यात सरासरी ४३.५ मिलीमीटर पावसाची नोंद घेतली गेली. पैकी जामनेर तालुक्यातील आठ पैकी चार महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. सर्वाधिक १५२.५ मिलीमीटर पाऊस नेरी मंडळात तसेच १००.८ मिलीमीटर तोंडापूर, ८३.३ मिलीमीटर शेंदुर्णी, ७०.३ मिलीमीटर जामनेर, ६६.३ मिलीमीटर वाकडी आणि ५२.८ मिलीमीटर पाऊस फत्तेपूर महसूल मंडळात नोंदविला गेला. अपवाद फक्त पहूर मंडळात पाऊस पडला नाही. याशिवाय, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर महसूल मंडळात ११३.८ मिलीमीटर आणि वरखेडी महसूल मंडळात ११३.८ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला.
