नाशिक : नाशिक जिल्हा परिसरात पावसाने धुमाकुळ घातला असतांना त्र्यंबकेश्वर शहरात सोमवारप्रमाणेच मंगळवारीही जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री अनेक घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यांना पाटाचे स्वरुप आले. बाहेरगावहून आलेल्या भाविकांसह स्थानिकांची पावसामुळे तारांबळ उडाली.सोमवारी रात्री त्र्यंबकेश्वरमध्ये एक तासापेक्षा अधिक वेळ पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर घाण आणि चिखल वाहून आला.
परिणामी शहरातील मुख्य चौक, रस्ते चिखलमय झाले. डोंगरावरील कचराही पाण्यात वाहून आल्याने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले. दुसरीकडे, पाण्याचा निचरा होत नसल्याने शहरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. रस्त्यालगत असलेली हॉटेल, पूजा सामान आणि प्रसाद विक्रीची दुकाने, कापड व्यावसायिक यांसह अन्य व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाण्याचे लोट आणि घाण यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल झाले. पावसाचा जोर ओसरल्यानंतर त्र्यंबक नगरपरिषदेच्या वतीने रस्ते तसेच चौक साफसफाई करण्यास सुरूवात केली.
मंगळवारी शहरात ठिकठिकाणी कचरा तसाच पडून होता. पाण्यामुळे कचरा सडल्याने दुर्गधी वातावरणात पसरली. मंगळवारी दुपारनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची धावपळ उडाली. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग तसेच गाळ आहे. या मुसळधार पावसाने कुंभमेळ्याचे शहरातील नियोजन कसे असेल, याचा अप्रत्यक्ष पाठ दिला असल्याची चर्चा आहे.