नाशिक – रात्रीपासून अविरतपणे सुरू असलेल्या तुफान पावसाने शहरातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अनेक प्रमुख चौक आणि काही रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. जुने नाशिकमधील चव्हाटा भागात घर कोसळले. सुदैवाने तिथे कोणी वास्तव्यास नव्हते. काही भागात झाडांची पडझड झाली. गंगापूर धरणातून विसर्ग न करताच गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे काठालगतच्या व्यावसायिकांची धावपळ उडाली. पुराचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले असून हंगामातील पहिला पूर येण्याची शक्यता बळावली आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारी रात्री आठ वाजता पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी सायंकाळपर्यंत तो कोसळत होता. पावसाचा जोर कायम राहिल्याने दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला. शहरातील रस्त्यांची आधीच वाट लागली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत.

पावसाने त्यामध्ये आणखी भर पडली. गडकरी चौक, उंटवाडी सिग्नल, तारवालानगर चौक यासह सिडको, पंडित कॉलनीतून व्ही.एन. नाईक महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता, सरस्वती लेन अशा अनेक भागात पाणी आल्याने वाहतुकीत अडथळे आले. अशा ठिकाणी वाहने बंद पडत होती. दुचाकीधारकांना तारेवरची कसरत करावी लागली. सखल भागात पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहत असल्याचे पाहण्यास मिळाले. नाशिकरोड, बारदाना फाटा, पंचवटी भागात झाडे कोसळल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

चव्हाटा भागात घर कोसळले

गुरुवारी दुपारी जुने नाशिकमधील चव्हाटा भागात देवी मंदिरालगत घर कोसळले. तिथे कोणी वास्तव्यास नसल्याने जिवितहानी टळली. हबीबा सय्यद यांचे हे घर होते. कोसळलेल्या घरामुळे आसपासच्या घरांना धोका निर्माण झाल्याने लगतची घरे रिकामी करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे राजेश मोरे यांनी दिली.

गोदावरी दुथडी भरून

शहर आणि परिसरातील पावसाने गंगापूर धरणातून विसर्ग न करताच शहरातून वाहणाऱ्या गोदावरीची पातळी उंचावली आहे. गोदावरीच्या पुराचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी टेकले. पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याची पातळी आणखी उंचावण्याची शक्यता आहे. अकस्मात वाढलेल्या पाण्यामुळे काठालगतच्या छोट्या टपऱ्या व अन्य विक्रेत्यांची धावपळ उडाली. पाण्यात साहित्याचे नुकसान होऊ नये म्हणून टपऱ्या इतरत्र हलवाव्या लागल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काठालगत उभी केलेली काही वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना अग्निशमन दलाने शिताफीने बाहेर काढली. दुपारी एक मोटार गाडगे महाराज पुलाजवळ अडकून पडली. रामसेतू पुलाला पाणी लागले. रामकुंड परिसरातील लहान पूल ये-जा करण्यासाठी बंद करण्यात आले. खंडोबा मंदिरासह आसपासची मंदिरे पाण्याखाली जाण्याच्या स्थितीत आहेत. अग्निशमन दलाची वाहने ध्वनिक्षेपकावरून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत फिरत होती. पाणी पातळी उंचावत असल्याने गोदावरीला हंगामातील पहिला पूर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.