नाशिक – येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना १९ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. नव्याने आलेल्या रुग्णवाहिकांमुळे आरोग्य विभागाची आपत्कालीन सेवांची उपलब्धता मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या सामाजिक दायित्व निधी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दिशेने उपक्रमांना मदत देण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे़. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी संस्थांचा सहभाग घेतला जातो. रुग्णवाहिकांची चावी आणि कागदपत्रे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. हर्षल नेहेते, डॉ. दीपक लोणे, डॉ. युवराज देवरे आदी उपस्थित होते,
योग्यवेळी रुग्णवाहिकेची मदत मिळाल्यास ग्रामीण भागातील लाखो लोकांचे आरोग्य सुधारुन मृत्युदरही कमी होण्यास मदत होते. या रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीत संबंधित रुग्णांना संदर्भ सेवा, रुग्णालयात संदर्भित करणे यासाठी उपयोगात येतील. उत्तम आरोग्यसेवा मिळाल्याने रुग्णांचे जीव वाचतील, असे यावेळी सांगण्यात आले.
आरोग्य उपकेंद्रांमध्ये अपूर्ण पायाभूत सुविधांमुळे रुग्णांना अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्हा रुग्णालयांमध्ये संदर्भित करावे लागते, त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वाहनाची व्यवस्था असणे गरजेचे असते. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांचे या मदतीसाठी आभार मानण्यात आले.
नाशिक जिल्हा आरोग्य विभागात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमुळे नव्याने दाखल झालेल्या १९ रुग्णवाहिका कळवण तालुक्यातील कनाशी, जयदर, मोकभणगी, नवी बेज, दिंडोरी तालुक्यातील ननाशी, नांदगाव तालुक्यातील बोलठाण, न्यायडोंगरी, निफाड तालुक्यातील निमगांव वाकडा, पेठ तालुक्यातील जोगमोडी, सुरगाणा तालुक्यातील मानी, मनखेड, बा-हे, उंबरगव्हाण , बागलाण तालुक्यातील केळझर, अंबासन, अलियाबाद, मुल्हेर , त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली , येवला तालुक्यातील पाटोडा या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी काम करणार आहेत.