नाशिक – पोलिसांकडून अवैध व्यवसायांवर छापे टाकले जात आहेत. गोवंश तस्करी रोखण्यासाठीही प्राधान्य देण्यात येत आहे. नाशिक शहरात पोलिसांनी गुन्हेगारांविरुध्द सुरु केलेल्या कारवाईमुळे ग्रामीण पोलिसांकडूनही गुन्हेगारी रोखण्यासाठी धडक कारवाई करण्यात येऊ लागली आहे. त्याअंतर्गत सिन्नर पोलिसांनी शासनाने बंदी घातलेल्या मांगुर माशांची वाहतूक करणारी टोळी जेरबंद करत त्यांच्यावर पर्यावरण संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच, या कारवाईत गुन्ह्यात वापरलेले वाहन, ४.६ टन वजनाचे मांगुर मासे असा २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाने प्रतिबंधित केलेल्या मांगुर जातीच्या माशांची सिन्नर परिसरातून काही जण मालमोटारीतून पुणेमार्गे परराज्यात बेकायदेशीरपणे वाहतूक करून घेवून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक हेमंत भामरे यांनी सहायक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण, हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, अमोल शिंदे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांचे पथक तयार करून संगमनेर नाका येथे नाकाबंदी केली. संशयित तपकिरी रंगाचे मालवाहतूक वाहन आल्यावर ते थांबविण्यात आले. वाहनचालकाकडे कागदपत्रांची विचारणा केली. वाहनाची तपासणी केली असता त्यात काळ्या रंगाच्या ताडपत्रीखाली मासे असल्याचे आढळून आले.

माशाच्या वर्णनानुसार प्रतिबंधित असलेले मांगुर जातीचे मासे असल्याचे दिसले. याबाबत सिन्नर पोलिसांनी जिल्हा मत्स्य विकास व व्यवसाय कार्यालय येथील प्रभारी सहायक आयुक्त किशन वाघमारे यांना दुरध्वनीवरून माहिती दिली. तसेच त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. हे मासे मांगुर जातीचे असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. या माहितीच्या आधारे सिन्नर पोलिसांनी मालमोटार आणि वाहनातील ४.६ टन वजनाचे मांगुर जातीचे मासे असा २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पर्यावरण संरक्षण कायद्यातंर्गत लुनाजी ताड (५५), लोकेश गतैया (४०), करण चौहान (२१) या मध्य प्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली. पुढील तपास चव्हाण करत आहे.