धुळे- भुसावळ ते उधना या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथून निघणाऱ्या खान्देश एक्स्प्रेसच्या धर्तीवर उधना-जळगाव-पुणे रेल्वेगाडी सुरु करावी, या मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील नरडाणा, दोंडाईचा आणि शिंदखेडा या तीन रेल्वे स्थानकांवर स्थानिक प्रवासी आणि ग्रामस्थांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आले.

नरडाणा रेल्वे स्थानकात पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शन वरून मुंबईला जाणार्‍या खानदेश एक्स्प्रेसच्या धर्तीवर उधना- जळगाव-पुणे ही नवीन रेल्वे सुरू करावी. यासह रात्री धावणार्‍या सुरत गाड्या दिवसा कराव्यात, मुंबई गाडीच्या वेळेत बदल करावा, नरडाणा स्थानकात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा, परिसरातील गावे, रहिवाशांच्या सोयीसाठी नरडाणा येथे रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी बोगदा मंजूर करावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

नरडाणा (ता.शिंदखेडा) हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील आणि नरडाणा औद्योगिक वसाहतीला लागून असलेले महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. यामुळे या स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडीला थांबा मिळावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. याशिवाय शैक्षणिक, औद्योगिक, आयटी क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता पुण्याला जा- ये करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. एकट्या धुळे शहरातून रोज २०० ते ३०० खासगी आरामदायी बस पुण्यासाठी धावतात. ही परिस्थिती लक्षात घेवून पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवरून नव्याने उधना-जळगाव-पुणे गाडी सुरू करता येणे शक्य असताना अनेकदा अशी मागणी करूनही ती मंजूर केली जात नाही. यामुळेच अखेर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा निर्णय प्रवाशांना घ्यावा लागला, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

’हमारी मांगे पुरी करो,उधना-पुणे गाडी शुरू करो’ यांसह अनेक घोषणांनी नरडाणा रेल्वे स्थानक दुमदुमले. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर रेल्वे अडवून आंदोलकांनी संपूर्ण रेल्वेचाच ताबा घेतला. शेवटी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आपल्या मागण्या रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहचवून लवकरात लवकर मार्ग काढू, असे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. तत्पूर्वी नरडाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनीही आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वे रुळावर ठाण मांडलेले आंदोलक हलले नाहीत. लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे रुळावर झोपून आंदोलन करू, असा इशारा दोलकांनी दिला. आंदोलनात संजीवनी सिसोदे, सिद्धार्थ सिसोदे, राजेश बोरसे, प्रवीण देसले, संजय खैरनार, विश्वास देसले, रमेश सिसोदे, शंकर सिसोदे, सागर सूर्यवंशी आदींसह परिसरातील गावकरी, प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याच मागण्यांसाठी नरडाणा बरोबरच दोंडाईचा येथेही प्रवीण महाजन आणि शिंदखेडा येथे गोविंद मराठे यांच्या उपस्थितीत रेल्वे रोको आंदोलन झाले.

मंत्री जयकुमार रावल यांचे वडीलही सहभागी

दोंडाईचा येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांचे वडील सरकार साहेबराव रावल स्वतः आंदोलनात सहभागी झाले. त्यांना रेल्वे प्रशासनाने लवकरच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे नरडाणा भेटीत मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.