धुळे : कांदा निर्यातीच्या व्यवसायात मोठा नफा मिळत असल्याचे आमिष दाखवून १० जणांनी धुळे तालुक्यातील नेर येथील एका व्यापाऱ्याला सुमारे ५८ लाख रुपयांना फसविले. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील नेर येथील स्वप्निल जयस्वाल या व्यापार्‍याशी १० जणांनी संपर्क साधला. कांदा निर्यात करण्यासंदर्भातील व्यवसायात मोठ्या प्रमाणावर नफा मिळत असल्याचे आमिष त्यांनी व्यापाऱ्याला दाखवले.

इतर व्यवसायापेक्षा कांदा निर्यातीत मोठ्या प्रमाणावर नफा मिळण्याच्या आमिषाला जयस्वाल हे भुलले. संशयितांनी सांगितल्याप्रमाणे २८ एप्रिल २०२३ ते १४ मार्च २०२४ या कालावधीत केजीएन ओनियन एक्सपोर्ट नावाच्या संस्थेमार्फत १६ कंटेनरमधून जयस्वाल यांनी कांदा निर्यात केली. संशयितांनी त्यापैकी केवळ दोन कंटेनरमधील कांद्यांचे पैसे देवून उर्वरित ५८ लाख १२ हजार ९८५ रुपये देण्यास टाळाटाळ केली.

हेही वाचा…राहुल यांच्या भेटीने गांधी कुटुंब-मालेगाव ऋणानुबंधास उजाळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशयितांनी अन्सारी अल अन्सारी एक्सचेंस संस्थेची बनावट पावती आणि बनावट धनादेश दिल्याचे उघड झाले. संशयितांकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जयस्वाल यांनी पोलिसांकडे धाव केली. जयस्वाल यांच्या तक्रारीनुसार धुळे तालुका पोलिसांनी कलीम शेख, सलीम शेख, बाबा शेख, तस्लीम शेख (सर्व रा. शिंदेमळा, येवला,नाशिक), पिंट्या (रा. कोपरगाव), रऊफ शेख (रा. येवला, नाशिक), अनिल सोनवणे, भिकन सोनवणे, जिजाबाई सोनवणे, अमोल बेडसे या संशयितांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.