जळगाव : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, उपसा व वाहतूक करणार्‍यांवर महसूल प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. जळगावसह रावेर, धरणगाव, मुक्ताईनगर व एरंडोल या तालुक्यांत नदीपात्रात उतरून महसूल पथकांकडून मोहीम राबविण्यात आली. वाळूसाठ्यासह डंपर, ट्रॅक्टर, तराफे जप्त करण्यात आले. पाच तराफे जागेवरच नष्ट करण्यात आले. काही भागांत सुगावा लागल्यानंतर वाळूमाफियांनी पळ काढला. दरम्यान, महसूल व पोलीस विभागाच्या कडक कारवाईनंतर वाळूचोरीत सहभागी असलेल्यांनी आता जलमार्गाचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन, उपसा व वाहतूक करणार्‍यांवर कारवाईच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत. काही महिन्यांपासून महसूल, पोलीस प्रशासनाने जेसीबीसह डंपर, ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा करणार्‍यांवर लक्ष्य केले आहे. काहींनी आता तराफ्यांच्या मदतीने चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरू केल्याचे आता निष्पन्न होत आहे. जळगावसह रावेर, धऱणगाव, मुक्ताईनगर, एरंडोल तालुक्यांतील नदीपात्रात महसूलच्या पथकांकडून धडक कारवाईची मोहीम राबविली जात आहे. एरंडोल तालुक्यातील गिरणा नदीकाठावरून तराफ्यांच्या सहाय्याने वाळूचा उपसा करणार्‍यांना तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी नायब तहसीलदारांसह तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामस्थांना सोबत घेत वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी धडक दिली.

हेही वाचा : नाशिकमध्ये वसतिगृहासाठी सारथी संस्थेला जागा उपलब्ध करण्याचे निर्देश

त्यामुळे वाळूमाफियांची चांगलीच धांदल उडाली. अधिकारी व कर्मचार्‍यांसह ग्रामस्थांनी पाण्यातील तराफे ताब्यात घेतले. उपसा केलेली वाळू गिरणा नदीपात्रात पुन्हा टाकत तीन तराफे नष्ट केले. तहसीलदार चव्हाण यांच्या पथकाने खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, खेडी हद्दीतील गिरणा नदीपात्रात धडक मोहीम राबिविली. पथकाने वाळूमाफियांचे पाच तराफे नष्ट केले. पथकात 20 ते 25 अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश होता. नायब तहसीलदार दिलीप पाटील, किशोर माळी, मंडळ अधिकारी मनोज शिंपी, मानकुंबडे, तलाठी नितीन पाटील, सुरेश कटारे, खेडी खुर्दचे माजी सरपंच सतीश सोनवणे, सरपंच पती नारायण सोनवणे, पन्नालाल सोनवणे, सुरेश सोनवणे, गणेश शिंदे, ज्ञानेश्‍वर सोनवणे, किशोर सोनवणे, प्रकाश कोळी, साहेबराव कोळी, सोमा कोळी आदींसह ग्रामस्थांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : दुधात भेसळ करणाऱ्यांची धुळ्यात अधिकाऱ्यांना दमदाटी

जळगावच्या पथकात परिविक्षाधीन अपर जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, तीन मंडळ अधिकारी व चार पोलीस कर्मचारी, रावेरच्या पथकात परिविक्षाधीन अतिरिक्त तहसीलदार मयूर कळसे, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल व पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता. दरम्यान, वाळूमाफियांपर्यंत महसूल पथकांची माहिती पोहोचल्याची बाब निष्पन्न झाली आहे. त्यामुळे पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या भ्रमणध्वनीतील संपर्काची इत्थंभूत माहिती तपासण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना दिल्या आहेत. आता कुणाच्या सूचनेवरून वाळूचा उपसा मजूर करीत होते, याबाबतीची माहिती काढण्यात येईल. मुख्य सूत्रधारासह वाळू व्यवसायात सहभागी असणार्‍या प्रत्येकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In jalgaon action taken against sand mafias pumping sand from tapi river css
First published on: 04-10-2023 at 18:07 IST