धुळे : युवकाच्या हत्या प्रकरणातील संशयितांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करुन हैदोस घालून पोलीस वाहन आणि रुग्ण वाहिकेवर तुफान दगडफेक करणाऱ्या ७० ते ८० जणांच्या जमावाविरुद्ध अखेर धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पंढरीनाथ चौधरी (२४, रा. विठ्ठल नगर, भाटपुरा, ता. शिरपूर) असे मृताचे नाव आहे. त्याला मद्याचे व्यसन होते. मद्याच्या धुंदीत तो आई – वडिलांना त्रास देत असे. यामुळे त्याची समजूत घालण्यासाठी त्याचा मेहुणा नितीन चौधरी आणि घनश्याम तथा मनोज चौधरी (दोघे रा. धरणगाव, जि. जळगाव) भाटपुरा (ता. शिरपूर) येथे आठ मे रोजी आले होते. यावेळी दोघांनीही पंढरीनाथ याला लाकडी दांडक्याने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा…धुळे : आपल्याकडे वेळ नाही, अडीच लाख रुपये द्या अन…

पंढरीनाथचा मृत्यू झाल्याचे कळताच गावातल्या विठ्ठल नगरमध्ये मोठा जमाव जमला. पंढरीनाथच्या हत्या प्रकरणी संशयितांना अटक करा या मागणीने जोर धरला. हळूहळू पोलीस आणि जमाव यांच्यात शब्दिक चकमक झाली. जमाव संतप्त झाला. काहींनी दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, के. के. पाटील, उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचारी असे पाच जण जखमी झाले.

हेही वाचा…लाच प्रकरणानंतर पुरातत्व विभागाचा कारभार चर्चेत

याप्रकरणी धनराज मालचे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, थाळनेर पोलिसांनी गुरुवारी रात्री अजय ऊर्फ पिंटु कोळी, हिंमत राजपूत यांच्यासह ७० ते ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त जमावाने केली. पण पोलिसांनी न ऐकल्याने त्याचा राग मनात धरुन जमावाने हा हल्ला चढविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.