नाशिक: गंगापूर धरणातून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांऐवजी बांधकाम व्यावसायिकांना वितरित होत असल्याचे उघड झाल्यानंतर वाहतूकदार आणि शेतकरी यांच्यात गाळ वाहतूक दराच्या तिढ्यावर मार्ग निघत नाही, तोपर्यंत गंगापूर धरणालगतच्या गंगावऱ्हे येथील गाळ उपशाचे काम थांबविण्यात आले आहे. या उपक्रमास सुरवात झाली, तेव्हापासून बोटावर मोजता येतील, इतक्याच शेतकऱ्यांना गाळयुक्त सुपीक माती मिळू शकली. उर्वरित गाळयुक्त माती विविध भागातील बांधकाम, भूखंड वा जमिनीत भर टाकण्यासाठी दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेचा मूळ उद्देश सफल होणार नसेल तर, हे काम थांबविण्याची सूचना लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने केली आहे.

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील गाळ उन्हाळ्यात काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी समृध्द नाशिक फाउंडेशन, भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग आदी संस्थांच्या योगदानातून एप्रिलच्या मध्यावर हाती घेण्यात आलेले जलसमृध्द नाशिक अभियान शेतकऱ्यांच्या आक्षेपांमुळे वादात सापडले. गंगावऱ्हे येथे चाललेल्या कामात १८ व्या दिवसापर्यंत २४६४ हायवा मालमोटार आणि ३०४ ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. यामुळे गंगापूर धरणाची साठवण क्षमता तीन कोटी लिटरने वाढल्याचा दावा केला जात आहे. खरेतर धरणातून काढलेल्या गाळातून शेतजमीन सुपीक करण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना तो मोफत स्वरुपात देण्याचे धोरण आहे. शेतकऱ्यांनी तो स्वखर्चाने वाहून नेणे अपेक्षित आहे. गाळ नेण्यासाठी शेतजमिनीचा सातबारा उतारा सादर करावा लागतो. या निकषाचे पालन न करता शेतकऱ्यांऐवजी तो बांधकाम व्यावसायिकांना वितरित झाल्याची तक्रार गंगावऱ्हे-सावरगांव ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाकडे केली होती. यावर ‘लोकसत्ता-नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने दखल घेतली.

हेही वाचा : नाशिक : विवाहितेचा दोन मुलींना गळफास, नंतर आत्महत्या

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता महेंद्र आमले यांनी नाशिक पाटबंधारे विभागाला याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पाटबंधारे व महसूलच्या अधिकाऱ्यांनी उपरोक्त ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी गंगावऱ्हे-सावरगांव ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मण बेंडकुळे व ग्रामस्थही उपस्थित होते.

वाहतूक भाड्याच्या दरावरून शेतकरी व वाहतूकदार यांच्यात मतभेद आहेत. शेतकऱ्यांच्या मते भाडे देण्याची तयारी दर्शवूनही वाहतूकदार शेतात गाळ वाहून नेत नाहीत. धरणातील गाळ बांधकाम व्यावसायिकांचे विविध भागातील बांधकाम, भूखंड वा जमिनीत टाकण्यासाठी जास्त वाहतूक भाडे आकारून नेला जातो. धरण स्थळावरील पाहणीत केवळ चार ते पाच शेतकऱ्यांना गाळ मिळाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा सरपंच बेंडकुळे यांनी केला. उर्वरित गाळ सातबारा उतारे न घेता विकसकांना दिल्याची तक्रार त्यांनी केली.

हेही वाचा : नाशिकरोडला युवकाची हत्या

गाळ काढण्याचे काम समृध्द नाशिक फाउंडेशनमार्फत केले जाते. या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी उपरोक्त ठिकाणी गाळ काढण्यासाठी दोन ठिकाणी व्यवस्था करण्याचा पर्याय सुचवला गेला. परंतु, ग्रामस्थांनी तो अमान्य करीत गाळ उपसा बंद करण्याचा मुद्दा लावून धरला. गाळ काढण्याचे कामा लोकसहभागातूून होत आहे. प्रशासकीय यंत्रणेने वाहतूकदार-स्थानिक शेतकरी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. गाळ काढण्यासाठी अतिशय कमी दिवस शिल्लक आहेत. उभयतांमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत गंगावऱ्हे येथील गाळ उपसा थांबविण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : “बाळासाहेबांना यांची क्षमता माहिती होती, त्यामुळेच…”; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!

जिल्ह्यातील धरणांमध्ये २१ कोटी लिटरचा अधिकचा साठा

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबविली जात असून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संस्थांचे योगदान व लोकसहभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील बँकांनी सामाजिक दायित्व निधीतून या योजनेच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेची आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, नंदकुमार साखला, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील धरणांमधून मृद व जलसंधारण विभागामार्फत ७० हजार ६७१ घनमीटर गाळ काढला असून लोकसहभागातून ३० हजार २०६ घनमीटर गाळ काढला गेला आहे. ३० हजार २०६ घनमीटर गाळ शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वखर्चाने वाहून नेला असून शासकीय योजना धरणाची घळभरणी कमाकरिता एक लाख पाच हजार घनमीटर गाळ वापरला गेला आहे. एकुण जवळपास दोन लाख १६ हजार ४७७ घनमीटर आजपर्यत गाळ काढण्यात आला आहे. यामुळे धरणामध्ये २१ कोटी लिटर अधिक पाणी साठा निर्माण होणार आहे असल्याची माहिती गिते यांनी दिली.