जळगाव – जिल्ह्यातील गुढे (ता. भडगाव) येथील रहिवाशी सीमा सुरक्षा दलातील जवान स्वप्नील सुभाष सोनवणे (३९) यांना कर्तव्यावर असताना पश्चिम बंगालमध्ये शनिवारी वीरमरण प्राप्त झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी जन्मगावी शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान स्वप्नील सोनवणे हे सीमा सुरक्षा दलात पश्चिम बंगालमध्ये जी.डी. कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. बांगलादेशच्या सीमेवरील बीओपी ढोलागुरी येथे फ्लड लाईट खांब क्रमांक १७ दुरुस्तीचे काम शनिवारी करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. आणि ते सरळ खाली सिमेंट काँक्रिटच्या तळावर जाऊन पडले. त्यांना तत्काळ सीमा सुरक्षा दलाच्या रुग्णवाहिकेतून सहकाऱ्यांसह बाळुरघाट जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रात्री साडेआठ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे मृत घोषित केले.

जवान सोनवणे यांचे पार्थिव घेऊन सीमा सुरक्षा दलाचे जवान विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. त्यानंतर मंगळवारी सकाळी १० वाजता गुढे येथे जवान सोनवणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी नातेवाईकांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी तहसीलदार भडगावच्या शीतल सोलाट, पोलीस उपनिरीक्षक सुधीर सोनवणे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, सीमा सुरक्षा दलाच्या ५७ बटालियनचे निरीक्षक कमल किशोर आणि सलामी पथक, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, सुमित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विकास पाटील, माजी सदस्य संजय पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख समाधान पाटील, हर्षल पाटील, शिवदास पाटील, सैनिक फेडरेशन भडगाव अध्यक्ष प्रमोद पाटील, गुढे येथील सरपंच कल्पना महाजन, पोलीस पाटील मिलिंद मोरे आदी उपस्थित होते.