जळगाव : जिल्ह्यातील वांग्याचे भरीत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. थंडीची चाहूल लागताच जिल्हाभरात आता भरीत पार्ट्या रंगू लागल्याने भरिताच्या वांग्यांना मागणी वाढली आहे. बाजार समितीत रोज २० ते २५ टन वांग्यांची आवक होत आहे. घाऊक दरात प्रतिकिलो १०-१५ रुपये, तर ग्राहकांपर्यंत २५-३० रुपये प्रतिकिलोने वांगी पोहोचत आहेत. काही प्रमाणात इतर जिल्ह्यांतही निर्यात केली जात असून, डिसेंबरमध्ये आवक ७० टनापर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रात खान्देश आणि विदर्भात हिवाळ्यात भरीत पार्ट्या रंगतात. या भरीत पार्ट्यांना लोक लांबून येऊन आवर्जून हजेरी लावतात. त. यावल तालुक्यातील भालोद, बामणोद व आमोदा येथील भरिताची वांगी खान्देशात प्रसिद्ध आहेत. लसलशीत चमकणाऱ्या वांग्यांना मोठी मागणी असते. त्यांची मागणी आता राज्यासह परराज्यात होत असून, बाजारात वांगी विक्रीस दाखल झाली आहेत.
हेही वाचा : नाशिक : पोलीस चौकीच्या आवारात दोन गटांचा गोंधळ
जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बामणोद, भालोद व आमोदा येथे भरिताच्या वांग्याची लागवड जूनमध्ये केली जाते. ऑक्टोबरमध्ये विजयादशमीच्या काळात वांग्यांचे उत्पादन निघण्यास सुरुवात होते. शेतांमध्ये काट्यांवर भाजलेल्या वांग्यांच्या भरिताची चव काही औरच असते. या वांग्यांना तेलसुद्धा मोठ्या प्रमाणावर सुटते. ऑक्टोबरमध्ये भरिताच्या वांग्यांना ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर होता. बाजार समितीत सध्या वांग्याची आवक रोज २० ते २५ टन होत आहे. उत्पादकांना १० ते १५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव दिला जात असून, किरकोळ विक्रीसाठी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दर आहेत. शहरातही भरीत विक्री केंद्रांत तयार भरिताला चांगली मागणी होत आहे.
हेही वाचा : सिटीलिंक बससेवेला पुन्हा ग्रहण; बोनस न मिळाल्याने सेवा ठप्प, नाशिककरांचे हाल
महामार्गालगतही भरीत वांगी विक्रेत्यांचे ठाण
जळगाव शहरातून गेलेल्या मुंबई- नागपूर महामार्गालगतही भरिताची वांगी विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. शहरातील महामार्गावरील कालिंकामाता मंदिर, अजिंठा चौफली, इच्छादेवी चौक, महाराणा प्रतापसिंह महाराज पुतळा चौक, विद्युत कॉलनी, शिव कॉलनी, मानराज पार्क, गुजराल पेट्रोलपंप, खोटेनगर यांसह ठिकठिकाणी भरिताची वांगी विक्रेते दिसून येत आहेत.
हेही वाचा : पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नवे पोलीस आयुक्त
“जिल्ह्यातील बामणोद, भालोद, आमोदा, पाडळसे (ता. यावल), आसोदा, भादली, ममुराबाद, विदगाव, कानळदा (ता. जळगाव), वरणगाव (ता. भुसावळ) परिसरातील उत्पादकांकडून भरिताची वांग्यांची आवक होत आहे. डिसेंबरमध्ये १० ते १२ मालमोटारींतून भरिताची वांगी येतील. ऑक्टोबरपासून थोड्याफार प्रमाणात वांगी येण्यास सुरुवात झाली आहे. उत्पादकांना गुणवत्ता व दर्जानुसार प्रतिकिलो १० ते १५ रुपये दर दिला जात आहे.” – कुणाल चौधरी (नंदिनी ट्रेडिंग कंपनी, बाजार समिती, जळगाव)